शंकर देवकुळे, सांगली : राज्यातील सर्वसामान्यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धांना बळी पडू नये, असं अनेकदा सरकार, प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून आवाहन केलं जातं. पण तरीही काही ठिकाणी सर्रासपणे जादूटोणा सारखे प्रकार घडतात. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पाळल्या जातात. अर्थात या अंधश्रद्धा आणि जादूटोणाच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर संघटना खमकेपणाने देशभरात काम करत आहेत. पण तरीही काही ठिकाणी जादूटोणा सारखे प्रकार दिसतात. सांगलीत देखील असाच काहीसा प्रकार समोर आलाय. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर सर्वसामान्यांकडून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जातोय.
सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न केला जात होता. याला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकाराबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद झालाय.
मंत्रतंत्र आणि जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे चित्रीकरणमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे. असे प्रकार सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे.
दरम्यान, आटपाडीमधील या धक्कादायक प्रकाराबद्दल श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगले यांनी संबंधित जिल्हा पोलीस प्रमुखांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.