पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले. त्यानंतर आज विविध मंत्री आपल्या खात्याचा पदभार स्वीकरणार आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पुणे, कोकण या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे स्टेशनचा भार लवकरच हलका होणार आहे. या ठिकाणी रेल्वेचे चार फलाट वाढविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रब्बी हंगाम २०२५- २६ साठी शेती पिकांच्या किमान आधारभूत किंमतींची निश्चिती करण्याकरिता केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची आज बैठक होत आहे. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन 15 मिनिट उशिरा धावत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची अडचण होत आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी मंगळवारी दुर्दैवी अपघाताची माहिती दिली. मलावीचे उपाध्यक्ष सॉलोस चिलिमा यांच्यासह नऊ जण विमान अपघातात ठार झाले.राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे.
Malawi Vice President Saulos Chilima, nine others killed in plane crash
Read @ANI Story | https://t.co/zHtJvlvBAs #Malawi #SaulosChilima #MalawiVicePresident pic.twitter.com/r1OiTnaY6e
— ANI Digital (@ani_digital) June 11, 2024
मुंबई एटीएसने 4 अवैध बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बनावट मतदान केले होते. बनावट कागदपत्रे बनवून तो मुंबईत राहत होता. इतर 5 बांगलादेशींचीही ओळख पटली आहे. सर्वजण फरार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. पिढ्यानपिढ्या संघर्ष, सेवा आणि बलिदानाच्या परंपरेला परिवारवाद म्हणणारे लोक सत्तेची इच्छा आपल्या ‘सरकारी कुटुंबात’ वाटून घेत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. शब्द आणि प्रत्यक्ष कृतीतील फरक म्हणजे नरेंद्र मोदी, अशी टीकाही त्यांनी केली.
कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ग्रामीण विकासाला पंतप्रधान मोदींचे प्राधान्य असून त्यासाठी अनेक योजना यापूर्वीच राबविल्या जात आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात ग्रामीण विकासासाठी क्रांतिकारी काम झाले आहे. महिला सक्षमीकरण हे आपल्या सरकारचे ध्येय आहे, त्यासाठी अनेक योजना सुरू आहेत. लखपती दीदी बनवण्यासारख्या मोहिमांचा आमच्या रोडमॅपमध्ये समावेश केला जाईल.
लडाखचे अपक्ष खासदार मोहम्मद हनीफा यांनी स्थानिक नेत्यांसह आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मोहम्मद हनीफाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हनीफा काँग्रेसला समर्थन देणार का? अशी चर्चाही रंगली आहे.
पुरुष हक्क आयोगासाठी दिल्लीतल्या दोन तरुणांनी 15 हजार किलोमीटरचा बाईक प्रवास केला आहे. देशात महिलांप्रमाणे पुरुषांसाठी सुद्धा आयोग लागू व्हावा या मागणीसाठी दिल्लीच्या अमजद खान आणि संदीप पवारिया या दोन तरुणांची भारत यात्रा सुरु आहे.
ठाण्यातील मुख्य बाजारपेठ या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात बाजारपेठेत ठाणेकरांची तारांबळ उडाली. खरेदी करण्यासाठी आलेल्या ठाणेकरांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली असून त्यांना भेटण्याठी आज ख्रिश्चन धर्मगुरूंनी अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी येत जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
पश्चिम विदर्भात आज मान्सून चे आगमन होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशीम, बुलढाणा , अकोला जिल्ह्यात आज मान्सूनचे होणार आगमन
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील फ्लॉवर व्हॅलीजवळ, रुणवाल नगरात साधना विला सोसायटी बाजूला होर्डिंग धोकादायक स्थितीत. हे होर्डिंग धोकादायक स्थितीत असून, या ठिकाणी कोणताही दुर्घटना होऊ नये यासाठी जाहिरात विभागामार्फत जागामालक आणि होर्डींग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात आली असून त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पश्चिम विदर्भात आज मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तविली आहे, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात आजपासून मान्सूनचे होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मान्सूनची अजूनही प्रतिक्षा आहे
जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत ही विनंती करण्यासाठी डॉक्टरांचं पथक पुन्हा दाखल झाले आहे. जरांगे पाटील उपचार घेत नसल्याचं सरकारला लेखी कळवले आहे असे तहसिलदार शेळके यांनी म्हटले असून राज्य शासनाच्या शिष्टमंडळाबाबत अजून कोणताही निरोप आलेला नसल्याचे तहसीलदार शेळके यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके हे उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील विनंती करत आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पहिल्याच पावसात महानगरपालिकेच्या नाले आणि गटार सफाईची पोलखोल झालीय. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन चालकसह रस्त्यावर पायी चालत असलेले नागरिकदेखील त्रस्त झाले आहेत.
शरद पवार स्वतः नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. आलेल्या प्रत्येकाची शरद पवार यांच्याकडून चौकशी केली जात आहे. युगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराला शरद पवार उपस्थित आहेत. बारामतीमधील पक्ष कार्यालयात शरद पवार यांचा जनता दरबार सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार बारामतीत जनता दरबार घेत आहेत. दर मंगळवारी युगेंद्र पवार पक्ष कार्यालयात जनता दरबार घेत आहेत. बारामती तालुक्यातून आलेल्या सर्व नागरिकांना युगेंद्र पवार पक्ष कार्यालयात भेटत आहेत. शरद पवार देखील जनता दरबारासाठी पक्ष कार्यलयात दाखल झालेत.
खासदार सुप्रिया सुळे पुणे महापालिका आयुक्तांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. पुणे शहरात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सुप्रिया सुळेंनी घेतला आहे. आयुक्तांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्या आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ चंद्राबाबू नायडू घेणार आहेत. शपथविधीच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्रप्रदेशला जाणार आहेत.
नीट परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. आरसीसी क्लासेसचे प्राध्यापक मोटेगावकर यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. नीट परीक्षेतील निकालात मोठा गोंधळ झाला होता. निकालाला स्थगिती देऊन फेर निकाल लावण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट घेतली. “राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो होतो. विद्यार्थी संघटनेत काम करतानाही राज ठाकरेंच्या संपर्कात होतो”, असं म्हस्के म्हणाले.
जालना- जरांगे पाटील उपोषण करत असलेल्या ठिकाणी आरोग्य पथक दाखल झालं आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. आरोग्य पथकाकडून जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे.
नाशिक- शिक्षक मतदार संघ निवडणुकीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मविआ उमेदवार संदीप गुळवे यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला महाराष्ट्राबाहेर नेलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांना शोधून मविआ नेत्यांनी अर्ज माघारी घेतला आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीत डमी उमेदवारांचा सुळसुळाट पहायला मिळतोय.
महाराष्ट्रमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला यश आले नाही याची खंत… लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ… दुधाला 35 रूपये दर दिला पाहिजे अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दुधाचे दर 35 रूपयांच्या खाली आल्यावर सरकारने अनुदान द्यावे… असं देखील हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
14 जूनला दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, शेलार यांच्या नेतृत्वात बैठक पार पाडणार आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
नवी मुंबई एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांच्या दरात वाढ… 20 ते 30 टक्के भाज्यांच्या दरात वाढ… भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ… पावसामुळे भाज्या कमी प्रमाणात येत असल्याने दरवाढ
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये मुळशीतील कार्यकर्त्यांची मागणी… फडणवीस यांनी राजीनामा न देण्यासाठी मुळशीत भाजप कार्यकर्ते बसले थेट उपोषणाला… देवेंद्र फडणवीस म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद, त्यांचा राजीनामा म्हणजे वेदनादायी गोष्ट…. कार्यकर्त्यांची भावना
इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार मुदामहून बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांना माया असती तर त्यांनी तात्काळ दखल घेतली असती. उपचार न घेण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली.नवी मुंबई एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे.भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.
युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील नागरीक शरद पवार यांच्या कडे अशी मागणी करणार आहेत. युगेंद्र पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतील.
शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करतील. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम होत आहे. त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकी मध्ये पेट्रोल भरत असताना अचानक मोबाईल फोन वाजला अन पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुकजाकीस्वारांनी व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि आग विझवली.
सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मोहोळ तालुक्यात झालेल्या तुफान पावसामुळे कोरडेठाक पडलेले बंधारे आता ओसंडून वाहत आहेत. तुफान बरसलेल्या पावसामुळे आता बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
मोदी कॅबिनेटमध्ये मोठ्या पदासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. सुनेत्रा पवार यांना केंद्रात घ्यावे अशी मागणी कार्यकर्ते, नेत्यांनी केली आहे. याविषयीचे पत्रही त्यांनी अजित पवार यांना पाठविले आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे इथं हवा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. घरांचे पत्रे उडून मैदानात पडले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरांसोबतच तीस झाडांचीही पडझड झाली आहे.
आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. कार्यकर्त्यांची शरद पवारांसमोर मागणी. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी द्या कार्यकर्त्यांची मागणी. गोविंद बागेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी पवारांसमोर बोलून दाखवली खंत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे.
जायकवाडी धरणात पहिल्याच पावसाने पाण्याची आवक सुरू. पहिल्याच पावसात संभाजीनगरला महिनाभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा जमा. जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठ्यात झाली वाढ. जायकवाडी धरणात 4600 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरण भरायला सुरुवात झाल्यामुळे मराठवाड्याला दिलासा.
युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी द्या. बारामती तालुक्यातील नागरिक शरद पवार यांच्याकडे करणार मागणी. युगेंद्र पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत. शरद पवार यांना विनंती करून नागरिक करणार युगेंद्र पवार यांच्या उमदेवारीची मागणी.
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कच्च्या बदामाची आवक सुरु झाली आहे. काश्मीरमधून येणाऱ्या या कच्चा बदामला बाजारात मोठी मागणी असून 250 ते 300 रुपये प्रतिकिलोने त्यांची विक्री होत आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 25 ते 30 रुपये किलो झाला आहे. सध्या बाजारात दिवसाला 150 गाड्यांची आवक होत आहे.
विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपूरातील माता रुक्मिणीची पालखी आज सासर पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. रुक्मिणीच्या पालखीचे यंदाचे 430 वे वर्ष आहे.महाराष्ट्रातील सर्वांत पहिली पालखी म्हणून माता रुक्मिणीच्या पालखीची ओळख आहे.
पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता “नाईट ड्युटी” असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. पाऊस पडत असताना संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.