धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयातील 2 औषधं बनावट असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.
बीडमध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यात चक्क पोलीस चौकीसमोरचं तरुणावर चाकू-कोत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे.
राजगुरूनगर चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. राजगुरूनगरच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बैठक बोलावली आहे.
महायुतीत तीन मोठे पक्ष एकत्र असल्याने उशीर झाल असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. आज किंवा उद्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप नेते परवेश वर्मा आणि मनजिंदर सिंग सिरसा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आप खासदार संजय सिंह यांनी ईडी कार्यालयात भेट दिली. ते म्हणाले, ‘त्यांच्याकडे फक्त तक्रार आली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने कारवाईचे आश्वासन दिले नाही. ईडी काय करेल याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. तक्रार मिळाल्याची अधिकृत माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे.
कल्याण पूर्व येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या झाल्यानंतर कोळसेवाडी परिसरात तणाव आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसर असलेल्या दफनभूमीत अत्यंसंस्कार होणार आहेत.
नाशिकच्या सिडको परिसरात आठ वर्षीय लहान मुलाला दुकानदाराकडून बेदम मारहाण करण्यात आली. दुकानात नोटबुक घ्यायला गेला असताना त्याच्या हातातून वस्तू पडली. त्यामुळे दुकानदाराकडून त्या मुलाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. या लहान मुलाच्या गालावर, पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. तुला बांधून ठेवू अशीही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
हा मुलगा रडत घरी गेला. त्यानंतर त्याचे वडील दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी मुलाच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ कल्याणमध्ये दाखल झाल्या आहेत. कल्याण पूर्वचे आमदार सुभा गायकवाड यांच्या कार्यालयात सुलभा गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर चित्रा वाघ या पीडित कुटुंबाच्या घरी भेटण्यास निघाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर चित्रा वाघ स्थानिक पोलिस ठाण्यात देखील जाऊन पोलिसांना या केस संदर्भाची माहिती विचारणार आहेत.
“मी सभागृहात मागणी केली होती. एसआयटी स्थापन केली होती. मी पत्र देताना एसपीचा उल्लेख केला होता. पण साहेबांनी डायरेक्ट आयजीकडेच तपास दिला आहे. त्यामुळे जोरात तपास सुरू आहे. बकरे की माँ कब तक दुवा मांगेगी असं म्हणतात तसं ही बकरी कुठंपर्यंत जाईल हे थोड्या दिवसात कळेल,” असं सुरेश धस म्हणाले.
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाला २०२३-२४ काळात सर्वाधिक पक्ष निधी मिळाला आहे. भाजपला २ हजार २४४ कोटी रूपये मिळाले आहेत. तर कॉंग्रेसला २८९ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. बीआरएसला ४९५.५ कोटी रुपये, डीएमकेला ६० कोटी रुपये, वायएसआर काँग्रेसला १२१.५ कोटी रुपये मिळाले आहेत.
जेएमएमने रोख्यांच्या माध्यमातून मिळालेले ११.५ कोटी रुपयांच्या पावत्या जाहीर केल्या आहेत. भाजपला विविध संस्था, निवडणूक ट्रस्ट्स आणि विविध कंपन्यांकडून २०२३-२४ या वर्षात सर्वाधिक पक्ष निधी मिळाला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलुगू कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितलं, “कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सरकार तेलुगू फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी आहे.” मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलंय की तेलुगू फिल्म इंडस्ट्रीने जबाबदार असणं आवश्यक आहे.
नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा झाली. १२ वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानातून शिंदे कुटुंबीय बाहेर निघाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला शिंदे कुटुंबिय पोहोचले. अमित शाह यांच्यासोबतही बैठक होणार आहे.
‘कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच राजगुरूनगरमध्येही अशाच प्रकारे आठ आणि नऊ वर्षांच्या सख्ख्या चिमुकल्या बहिणींची निर्घृण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांत हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणीप्रमाणे पोलिसी बळाचा गैरवापर झाला नाही पाहिजे, पण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकही राहिला पाहिजे आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाकही राहिला पाहिजे. पण तसं होताना आज दिसत नाही आणि आज हे रोखलं नाही तर उद्या ते हाताबाहेर जाऊ शकतं. म्हणून सरकारने आज प्राधान्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सरकारची पॉवर आणि कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देण्याची गरज आहे,’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय.
सांगलीच्या वाळवा आणि शिराळा तालुक्यात वारणा पट्ट्यात धुक्याची चादर पहावयास मिळाली. पहाटे पासून तालुका धुक्यात हरवला होता. तर या धुक्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. तर या धुक्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याला फटका बसणार आहे.
जालना शहरातील नवीन मोंढा भागात असणाऱ्या एका एजन्सीचं दुकान फोडणाऱ्या कुख्यात आरोपीला चंदनजीरा पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतलय.या आरोपीने दुकान फोडून सिगारेटचे पाकीट,सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मोबाईल असा एकूण 9 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
संतोष देशमुख यांच्या हत्येमाग वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड आहे. त्याला अटक का होत नाहीये असा सवाल बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विचारला.
राजगुरूनगर दोन चिमुकल्या मुलींच्या खुनाने हादरलं, शेजारी राहणाऱ्यानेच खून केल्याचा संशय आहे. काल दुपारी 1.00 वाजता राहत्या घराच्या अंगणात खेळत असताना या दोन्हीं बहिणी गायब झाल्या होत्या.
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणात आरोपी विशाल गवळी याला शेगाव येथून अटक करण्यात आली. त्याला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात शनिवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे कुटुंब केवळ न्याय मागत असल्याचे त्यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणारच. मोदी त्यांचे बॉस आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमचे बॉस बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. आम्ही त्यांना महाराष्ट्रातच भेटायचो, असा चिमटा त्यांनी काढला.
बीड जिल्ह्यात मूक मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. बीड शहरात मूक मोर्चाची बॅनरबाजी, संतोष देशमुख यांचे फोटो असलेले झळकले बॅनर.
न्याय पाहिजे असा बॅनरवर उल्लेख. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा शनिवारी काढण्यात येणार आहे.
कल्याण तेरा वर्षाची अल्पवयीन मुलीचं अपहरण वहत्या प्रकरण – थोड्याच वेळात आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी होईल.
बीडमध्ये राजकीय प्रकरणातून 38 हत्या झाल्या आहेत. फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची चिंता, मग बीडमध्ये कोण ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाचे नेते उदय बने यांनी घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट, उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाली इथल्या निवासस्थानी झाली दोघांची भेट
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने उदय बने यांनी बंडखोरी केली होती. बने यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.
कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला थोड्याच वेळात कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण कोर्टात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील वाढता तणाव पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात.
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी-पाम हॉटेल उड्डाणपुलाचे काम सुरू. वाहतुकीचा ताण होणार कमी. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) 700 कोटींच्या प्रकल्पासाठी 70% जागेचे अधिग्रहण पूर्ण. 2.5 किमी लांब उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार .उल्हासनगर-अंबरनाथ वाहतूक थेट बिर्ला कॉलेज रस्त्यावर वळवणार. 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 5 मिनिटांत शक्य. 30 महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी ११ वाजता नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित असणार.
दिंडोरी पोलिसांनी केली मोठी कारवाई. दिंडोरीतील लॉजवर सुरू होता छापखाना. प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी केला जप्त. 20 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या. यापूर्वी आडगावला 2017 मध्ये 2021 ला सुरगाण्यात आणि 2024 ला निवडणूक काळात अंबडला बनावट नोटांच्या संदर्भात कारवाई. वारंवार बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊनही उद्योग सुरूच.
राज्यात शिवशाही बसेसचे सातत्याने ब्रेक डाऊन आणि अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ताफ्यातील सर्व शिवशाही बसेसची अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपासणी करण्याचे आदेश सर्व विभागांना दिला आहे. आज पासून पुढील चार दिवस तपासणी करण्यात येणार आहे. 4 जानेवारीपर्यंत अहवाल मागवला.
गेले काही दिवस मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावू लागला आहे. ‘समीर’ अॅपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता. काही भागांत ‘अतिवाईट’ तर, काही भागांत ‘वाईट’ हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम 2.5 आणि पीएम 10 धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे. बोरिवली येथे बुधवारी सायंकाळी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक 304 नोंदवला गेला. त्याचबरोबर देवनार, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली.
कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला कल्याण क्राईम ब्रांचने ठाण्यात ठेवल्याची माहिती. कल्याणमध्ये तणावाचं वातावरण पाहता हा निर्णय घेतला. काल मुख्य आरोपी विशाल गवळी याला शेगाववरून कल्याण क्राईम ब्रांचने घेतले होते ताब्यात. रात्री कागदोपत्री प्रोसेस पूर्ण करून त्याला ठाण्यात आणले. दुपारी कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती.
मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आज जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 आणि 28 तारखेला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गारपीट, वीज आणि वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून पत्नीने घडवून आणल्याची माहिती तपासात उघड झाली. पतीच्या जाचामुळे पत्नीने मारेकऱ्यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. रासायनिक खतांच्या किंमती आधीच जास्त असताना, खत उत्पादक कंपन्यांनी येत्या एक जानेवारीपासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किंमतीत 200 ते 300 रुपयांची वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.