साताऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसाचा दरे गावचा दौरा आटपून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री भरत गोगावले हे देखील आहेत. श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त एकनाथ शिंदे हे दरेगावी आले होते.
अहिल्यानगर शहरात पतंग उडवण्यावरून दोन गटात राडा झाला आहे. बालिका आश्रम परिसरात दोन गटात दगड आणि चाकूने हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवले . या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नाही. डीजे लावण्यावरून आणि पतंग उडवण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील बोर्ली येथील श्री संतोबा महाराज यांच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी तालुक्यातील हजारो भाविक भक्त दाखल झाले आहेत. आदिवासी लोकांचे श्रध्दास्थान आणि नवसाला पावणारा देव अशी ख्याती आहे. एकूण 4 दिवस ही जत्रा चालणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोज येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याच्या ताब्याची एसआटीला परवानगी देण्यात आली आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. त्यानंतर जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडचा ताबा घेणार आहे. तसेच हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.
एकतर्फी वागणाऱ्या पोलिसांवर आमचा आक्षेप आहे, असं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं आहे. आम्हाला न्याय हवा आहे असं सोनावणे यांनी सांगितलं. तपास पूर्ण झाल्यावर जे गुन्ह्यात सापडतील त्यांच्यावर कारवाई होईल. प्रकरण अजून न्यायालयात सुरु आहे, असंही बजरंग सोनावणे यांनी पुढे सांगितलं.
माझ्या मुलाला न्याय द्या वाल्मिक कराडच्या आईने मागणी केली आहे. दुसरीकडे, जिथपर्यंत गुन्हे मागे घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही असाच ठिय्या मांडून बसणार आहोत असं कराड कुटुंबियांनी सांगितलं आहे.
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीमधील वातावरण तापलं आहे. कराड समर्थकांनी परळीत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. कराड समर्थकांकडून परळी बंदचं आव्हान करण्यात आला आहे. परळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहेत.
हत्या प्रकरणात एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा मागितला आहे. कराडवर हत्याचा कट रचल्याचा आरोप आहे. न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळात निर्णय देणार आहे. कराडवर मकोका लागल्याने परळीत बंद पाळण्यात आला आहे. कराड समर्थकांनी परळीत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. कराडला उद्या पुन्हा मकोका कोर्टात हजर करणार आहेत.
वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहे. त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडवे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत.
गेली दीड महिन्यापासून धाराशिव जिल्ह्याच्या येडशी अभयारण्यत आणि सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी परिसरामध्ये वाघ दिसल्याने या परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती मात्र या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा येथील रॅपीड रेस्क्यू टीम धाराशिवच्या येडशी अभयारण्यात दाखल झाली आहे.
केज न्यायालयात दोन्ही बाजूनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले आहे. वाल्मिक कराड याला सोडण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी टायर जाळण्यात आले आहे.
केज कोर्टात वाल्मिक कराड याला सीआयडी कोठडीची विनंती करण्यात आली आहे. त्याला सरकारी पक्षाने दहा दिवसांची कोठडी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बलकर, आमदार चेन्नराज हट्टीहोळी यांना एका भीषण रस्ते अपघातात किरकोळ दुखापत झाली, सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबाडगट्टी गावात ही घटना घडली.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि फोटोमध्ये वाघ दिसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी यडशी अभयारण्यात ताडोबाची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे.
शेगांव तालुक्यातील केस गळती प्रकरणात दिल्ली येथून icmr चे पथक गावात दाखल झाले आहे या पथकासोबत जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी देखील आहेत. या पथकात 8 लोकांचा समावेश आहे ..
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगावात ठिकठिकाणी महिलांनी थाटलेल्या खापरावरच्या पुरणपोळीच्या विक्रीच्या दुकानांवर चांगली गर्दी झाली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकाराने निधन… प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये गेले असताना झाले निधन… नुकत्याच झालेल्या विधानसभेला सोलापूर शहर उत्तर मधून लढवली होती निवडणूक… मागील अनेक वर्षांपासून महेश कोठे यांचं सोलापूर महापालिकेवर वर्चस्व होतं…. सोलापुरातील मातब्बर नेते म्हणूनही ते प्रसिद्ध होते… प्रयागराज येथे महा कुंभमेळ्याला गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 25 हून अधिक महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात… फिरोज शेख असं अटक केलेल्या तरुणाचं नाव… शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख साधत होता संपर्क… अनेक महिलांवर शारीरिक अत्याचाराबरोबरच पैसे आणि दागिने देखील उकळले… कोल्हापुरातील फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई… फिरोज शेख ला ताब्यात घेतल्यानंतर पंचवीस हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची शेखची धक्कादायक कबुली…
रामदास कदम यांचं वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज… पाळलेले पोपट हे फडफड करत आहेत… राऊतांनी साधला निशाणा
शरद पवार आज पत्रकार परिषद घेत आहेत, त्याकडे लक्ष ठेवा…. इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधक जिवंत राहणार नाही… इंडिया आघााडी आणि मविआ तुटलेली नाही… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानिक भाविकांसह बाहेरून आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर फुलला आहे. संक्रांतीच्या निमित्ताने अंबाबाई समोर तिळगुळ ठेऊन दिवसाची सुरुवात करण्याची भाविकांची परंपरा यावर्षी देखील कायम आहे. मंदिर परिसरात भाविकांकडून एकमेकांना तिळगुळ देत मकसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर भाविक महिलांकडून मंदिर परिसरात विविध पूजा करण्यात येत आहेत.
संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रीशी संबंधित 34 विक्रेत्यांना चंद्रपूर तालुक्यातून तडीपार केले आहे. पतंग उडवताना या नायलॉन मांजाचा वापर केल्याने मनुष्य व पक्षी प्राण्यांना हानी होत आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या वतीने नायलॉन मांजा विक्री विरोधात धाडसत्र राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर सातत्याने कारवाई करूनही याच कामात गुंतलेल्या काही इसमाविरोधात अशा पद्धतीने तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार चंद्रपूर पोलिसांनी चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्गुस, दुर्गापूर अशा 4 पोलिस ठाणे हद्दीतून 34 इसमाना 3 दिवसांसाठी तडीपार केले आहे. अशा पद्धतीची ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आठवडाभरात सोने प्रतितोळा ११०० तर चांदी २ हजार रुपयांनी महागली आहे. सध्या स्थितीत सोने जीएसटीसह ८१,१६४ तर चांदी ९२ हजारांवर पोहोचले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला सोने ७६,५०० रुपये प्रतितोळा तर चांदी ८८ हजार रुपये किलो होती. त्यानंतर नवा विषाणू आणि शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
बीड मस्साजोग- धनंजय देशमुख आज SIT चे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी बारा वाजता केज येथील शासकीय शासकीय विश्रामगृहात ही भेट होणार आहे. धनंजय देशमुख आणि एसआयटीच्या पथकामध्ये तपासाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. कालच्या आंदोलनानंतर आज मस्साजोगमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्थानासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. आज मकर संक्रांतीनिमित्त तीर्थ स्नानाचं महत्व आहे. सूर्य आज मकर राशीत प्रवेश करत असल्याने देशभरातील तीर्थस्थानांवर गर्दी होते. प्रयागराजमध्येही आज कुंभ पर्वाचं शाही स्नान आहे.
बीड प्रकरणासंदर्भात उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे. उज्ज्वल निकमांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली.
बीड: संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच मनाई आदेश लागू करण्यात आले असून चारपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मज्जाव केलाय. आंदोलन, मोर्चे यावरही प्रतिबंध आहे. 28 जानेवारीपर्यंत मनाई आदेश असून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. महायुतीच्या आमदारांचा ते उद्या क्लास घेणार आहेत. मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसोबत स्नेहभोजनही करणार आहेत. महायुतीतील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्डही द्यावे लागणार आहेत. पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार आहे.
नवी मुंबईतील दिघा यादवनगर येथे पहाटे आग लागली. आगीमध्ये एक रिक्षा, एक टेम्पो आणि 2 दुकानं जळून खाक झाली. एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुलढाणा- शेगांव तालुक्यातील केस गळती प्रकरणी दिल्ली, चेन्नई, पुणे येथील ICMR चे पथक आज गावात जाऊन ग्रामस्थांना भेट देणार आहेत. या पथकांमध्ये 8 तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. सोबत जिल्हा आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत. बाधित रुग्णाची तपासणी, तसेच नमुने घेऊन शोध घेणार आहेत.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सातपैकी एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका दाखल करण्यात यावा, या मागणीसह हत्येतील तपासाच्या संदर्भाने कुटुंबीयांना आवश्यक ती माहिती मिळत नसल्याचा आरोप करून मस्साजोग ग्रामस्थ, संतोष देशमुख यांचे बंधू, मुलीसह कुटुंबीयांनी सोमवारी गावातील पाण्याच्या दोन टाक्यांवर चढून आंदोलन केलं. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे. तर खंडणी प्रकरणाततील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्रपरवाना बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकातील नऊ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे सहा अधिकारी नियुक्त करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात मोठ्या चर्चेचा विषय आहे. यांसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.