संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीने पुढचा तपास सुरु केला आहे. वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी अधिकारी बीडच्या केजकडे रवाना झाले आहेत. आजच केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडची मागणी सीआयडी कोर्टाकडे करणार आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्याचं राजकारण तापलं आहे. आरोपी कोणीही असलं तरी सोडणार नाही असं फडवणीस यांनी सांगितलं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. सरकारच्या कठोर भूमिकेमुळेच वाल्मिक कराड शरण आल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी 10.30 वाजता लोककल्याण मार्गावर ही सभा होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. असे मानले जात आहे की आम आदमी पार्टी सरकारच्या सततच्या घोषणांमुळे केंद्र सरकार दिल्लीसाठी काही योजना जाहीर करू शकते.
बीडच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित यांनी फडणवीसांसमोर गाऱ्हाणं मांडलं. वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर या आमदारांनी ही भेट घेतली.
आमदार सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद असे करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात, असे प्राजक्ता माळी यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला. त्यामुळे सरकारवर दबाव आला. वाल्मिकी करडा शरण येणे हे सीआयडी चे यश नाही. सरकारवर जो आम्ही दबाव टाकला होता त्यातून हा मानसिक दबाव वाल्मिकी कराडवर आला असेल, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाले आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज पालघर मधील डहाणूत असलेल्या ग्राम मंगल या संस्थेच्या शाळेला भेट देऊन संस्था चालकांची संवाद साधला. त्यांची भूमिका जाणून घेतली.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून धुळे बस स्थानकाचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. चार कोटीच्या निधी मधून रस्ते कॉंग्रेटीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थ सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत.
दोन तरुणांच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला डोंबिवलीच्या कुंभारखाना येथे बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विष्णुनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारासाठी यंदाचा वर्ष आहे “गोल्डन इयर” ठरलं. 2024 या वर्षात जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली.
वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्त केल्याशिवाय आका आणि त्याचे मालक सरळ होणार नाही, ते काम लवकर झाले पाहिजे. तीन आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराड हा सीआयडीकडे शरण आला. तो स्वतःहून सीआयडी कार्यालयात पोहचला. त्याच्या औषधांची एक बॅग सहकाऱ्याने आणली असता ती सीआयडीने तपासली आणि कार्यालयात नेली.
हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या बेपत्ता अभियंता योगेश पांचाळ यांच्या शोधासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला. इराणचे कॉन्सुलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांची त्यांनी मुंबईत भेट घेतली. योगेश पांचाळ यांचा तातडीने शोध घेण्याची विनंती केली.
राज्यामध्ये 31 डिसेंबर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये ही 31 डिसेंबर हा साजरा केला जात आहे. सकाळपासूनच सांगलीच्या मटन मार्केटमध्ये सांगलीकरांनी चिकन, मटन, आणि मच्छी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
वाल्मिक कराड हा शरण आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जितेंद्र आव्हाड मुंबई पक्ष कार्यालय येथे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
वाल्मीक कराड शरण आल्या नंतर उर्वरित आरोपींच्या अटकेची मागणी करीत मसाजोग चे गावकरी उद्या जलसमाधी आंदोलन करणार, जवळच्या तलावात सकाळी करणार जलसमाधी आंदोलन, सिडीआर तपासा आणि आरोपीच्या संख्या वाढवा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
वाल्मिक कराडची प्रशांत बोरुडे यांच्याकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे समोरा समोर चौकशी करत आहेत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी, धुंडलवाडी, तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. परंतु आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
“कोण शरण आलं आणि कोण नाही याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमच्या भावाची हत्या झाली. त्यातील आरोपी सुटता कामा नये. ज्यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे,” असं जरांगे पाटील म्हणाले.
वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करतेय, मग इतका वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय?,” असा सवाल त्यांनी केला.
बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहे.
रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनारी रोमहर्षक पॅरासिलिंगचा थरार पाहायला मिळत आहे. पॅरासिलिंगच्या माध्यमातून 300 फूट अंतरावरुन निळाक्षार समुद्राचा आनंद लुटता येत आहे. पॅरासिलिंगच्या साहसी खेळाचा अनेक पर्यटक आनंद घेत आहेत.
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे 3 दिवस कामकाज बंद राहणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 543 ग्रामपंचायत कामकाज बंद आहे. सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आजपासून 2 जानेवारी 2025 दरम्यान कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. सरपंच संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीसमोर काळ्या फिती लावून आंदोलन सुरु आहे.
बीडचे सर्वपक्षीय आमदार संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहेत. कुणी कितीही मोठा असला तरी कारवाई व्हावी. प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याची आमची तयारी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यातील हुतात्मा झालेल्याच एक स्मारक विद्यापीठाच्या गेट समोर होत आहे. मात्र ज्या जागेवर हे स्मारक उभं केलं जातय, ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात आला असल्याने हे बांधकाम थांबवण्यात आलं आहे. सईद जमीउद्दिन कादरी सईद सादिक अली यांनी ट्रिब्यूनल कोर्टात हा दावा दाखल केलाय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख हे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते.
भाजपा आमदार सुरेश धस मुंबईकडे रवाना. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती. मतदार संघातील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे लवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सपत्नीक येणार आहेत. त्यासंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेणार असल्याची माहिती.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज असताना त्यांच्या संरक्षणासाठी 15 हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात असेल. पोलीस थर्टीफर्स्ट निमित्ताने चालणाऱ्या पार्टींवर लक्ष ठेवणार असून ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबविणार आहेत. शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे.
आज 31 डिसेंबर, वर्षातला शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच जल्लोषात स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी पार्ट्यांचा आयोजन करण्यात आलं आहे. थर्टी फर्स्ट नाईटच्या रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्यभरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 22 दिवस पूर्ण झालेत. तर आज मोठी नाट्यमय घडामोड घडली. सकाळपासून वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर पुण्यात तो सीआयडी कार्यालयात हजर झाला. त्यानंतर या हत्याप्रकरणात आता पुढे नेमकं काय होत, याची चर्चा रंगली आहे, कराड याने आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला आहे.