सिंधुदुर्ग : ‘टीव्ही 9 मराठी’चे जिल्हा प्रतिनिधी महेश सावंत (Mahesh Sawant) यांना कणकवली पत्रकार समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महेश सावंत हे गेली 28 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात असून Tv9 मराठी वृत्तवाहिनीच्या सुरवातीच्या काळापासून ते कार्यरत आहेत. कणकवली पत्रकार समितीच्या आदर्श पत्रकार पुरस्कारानंतर संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’चे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनाही अशाच एका पुरस्काराने गौरविण्यात आलंय. पत्रकार दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्याशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतो. अतिशय प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा हा पुरस्कार असतो. यंदाचा उत्कृष्ठ वृत्तवाहिनी पत्रकार पुरस्कार सांगली जिल्ह्याचे ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांना प्रदान करण्यात आला.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे, जिल्हा अध्यक्ष शेखर जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
देवकुळे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत असून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.