भारतात सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. येत्या 19 एप्रिलला म्हणजेच पुढच्या तीन दिवसांनी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या तीन दिवस आधी TV9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलची आकडेवारी महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे. कारण या निवडणुकीत पक्षफुटीला मान्यता नाही, असा संदेश महाराष्ट्राची जनता देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन बड्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर आता देशाची सर्वात महत्त्वाची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत पक्ष फुटीला लोकमान्यता नाही, असंच दिसण्याची शक्यता आहे. कारण ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला केवळ तीन जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष भुईसपाट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर काही महिन्यांनी हे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याला कारणीभूत ठरलं. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अर्ध्या पेक्षा जास्त आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले. त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले. सुरुवातीला काही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा करत होते. पण नंतर ते सुद्धा गुवाहाटीला गेले. यानंतर सरकार स्थापनेनंतर सर्वजण महाराष्ट्रात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. हे सरकार वर्षभर चालल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे देखील अतिशय नाट्यमयरित्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले.
विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या गटांनी कायदेशीर लढाई देखील लढली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता दिली. तर अजित पवार यांच्या गटाला मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितला. विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी दोन्ही गटांना दिलासा दिला. विधानभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालानुसार निकाल दिला. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. पण या सर्व राजकीय घटनांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं मत काय आहे, त्यांची भूमिका काय आहे? ते आता कायदेशीरपणे लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीआधी आलेल्या ओपनिंगपोलची आकडेवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धक्का देणारी आहे.
ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक 25 जागा जिंकण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या दोन मित्रपक्षांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला एकाही जागेवर खातं खोलणं कठीण असण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष 10 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी 5 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे.
लोकशाहीचा महापर्व मतदानाआधी Tv9 चा देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये देशभरातील सर्व 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. Tv9, Peoples Insight, Polstrat च्या सर्व्हेत जवळपास 25 लाख नागरिकांचा सँपल साईज आहे. या ओपिनियन पोलमध्ये COMPUTER ASSISTED TELEPHONE INTERVIEWING च्या अंतर्गत नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह ओपिनियन पोलच्या या सर्वेक्षणासाठी रँडम नंबर जनरेटरद्वारे कॉल करण्यात आला होता. यामध्ये लोकसभेच्या सर्व 543 जागांचा समावेश करण्यात आला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून नमुने घेण्यात आले. हे काम 1 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत करण्यात आले, ज्यामध्ये देशभरातील 4123 विधानसभा जागांचा नमुना घेण्यात आला.