लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दोन नंबरचा पक्ष ठरणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, शिंदे गटाला केवळ 3 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं देखील उघडणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक असणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठिमागे मोठी सहानुभूतीची लाट असण्याची शक्यता आहे. या सहानुभूतीच्या लाटेमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतील इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला एकूण 20 जागांवर महाराष्ट्रात विजय मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला सर्वाधिक 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा महायुतीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय मिळण्याची शक्यता आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढाई सुरु आहे. अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पण तरीही ओपिनियन पोलच्या आकडेवारीत ही जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. मावळची जागा ठाकरे गट जिंकण्याची शक्यता आहे. तर लातूरची जागा काँग्रेस जिंकू शकते. तर धुळे, मुंबई उत्तर लोकसभेची जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे.
लोकशाहीचा महापर्व मतदानाआधी Tv9 चा देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये देशभरातील सर्व 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. Tv9, Peoples Insight, Polstrat च्या सर्व्हेत जवळपास 25 लाख नागरिकांचा सँपल साईज आहे. या ओपिनियन पोलमध्ये COMPUTER ASSISTED TELEPHONE INTERVIEWING च्या अंतर्गत नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह ओपिनियन पोलच्या या सर्वेक्षणासाठी रँडम नंबर जनरेटरद्वारे कॉल करण्यात आला होता. यामध्ये लोकसभेच्या सर्व 543 जागांचा समावेश करण्यात आला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून नमुने घेण्यात आले. हे काम 1 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत करण्यात आले, ज्यामध्ये देशभरातील 4123 विधानसभा जागांचा नमुना घेण्यात आला.