मुंबई : आपल्याच राजकीय आत्मकथेच्या कार्यक्रमात, अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा निर्णय घेतला आणि अख्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. पण शरद पवारांच्या या निर्णयाला अजित पवार सोडून इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. कार्यकर्त्यांनी वाय बी चव्हाण सेंटर बाहेरच आंदोलन सुरु केलं. तर सिल्व्हर ओकवरही पवारांसोबत ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ पुन्हा वाय बी सेंटरला आले. निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार, 2-3 दिवसांत पुनर्विचार करणार असल्याचं, अजित दादांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पवारांच्या निवृत्तीवरुन उघडपणे संघर्ष पाहायला मिळाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भुजबळ…अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील आणि आव्हाडांसारख्या दिग्गजांनी पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला विरोध केला. तर अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत, शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन केलं. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना तर अश्रू अनावर झाले.
विशेष म्हणजे 5 दिवसांआधीच शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. पण पवार स्वत: बद्दलच बोलले हेही आता स्पष्ट झालं. शरद पवार अशाप्रकारे, निवृत्तीची घोषणा करतील असं राष्ट्रवादीच्याच काय महाविकास आघाडी आणि विरोधकांनाही वाटलं नव्हतं. मात्र आपल्या निवृत्तीची घोषणा करताच, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांसमोर निवृत्ती मागे घेण्याचा आग्रह धरला.
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळांनी पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण आपण अध्यक्षपदापासून दूर होणार, सार्वजनिक कार्यक्रमापासून नाही असं आश्वासन पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बोलल्यानंतर सुप्रिया सुळेही बोलतील, असं वाटत होतं. पण सुप्रिया बोलू नकोस, म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना बोलण्यापासून रोखलं. आपण अधिकारवाणाने मोठा भाऊ म्हणून बोलतोय हेही अजित पवार म्हणालेत.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला पाठींबा देणारे फक्त अजित दादाच दिसले. शरद पवारांसमोरच, जर नवा अध्यक्ष तयार झाला तर काय बिघडतंय? अशा शब्दात दादांनी पवारांच्या निवृत्तीला विरोध करणाऱ्या नेत्यांनाच झापलं. नवा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या पुढच्या वाटचालीबद्दल अजित पवार बोलत होते, त्याचवेळी कार्यकर्ते आणि नेत्यांनी मात्र दादांच्या वक्तव्याचा शरद पवारांसमोरच विरोध केला. पवारांनी सर्वच नेत्यांचं ऐकून घेतलं. नेते आणि कार्यकर्तेही निवृत्तीच्या घोषणेनंतर आक्रमक झाले. काही कार्यकर्ते उपोषणाला बसले. तर काहींनी पवारांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.