नांदेड : मांजरा नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरुण पाण्यात बुडाले, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख इफ्तेकार मोईन शेख (वय 20 वर्षे आणि नवाज नजिर कुरेशी (वय 21 वर्षे) अशी मृतांची नावं आहे.
कासराळी येथील शेख इफ्तेकार मोईन शेख, नवाज नजिर कुरेशी, अजमद बाबू धामनगावे हे दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास कासराळी येथून मोटार सायकलने बोधन येथे गेले. बोधन येथील आपले काम आटोपून दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परत कासराळीकडे येत असताना तिघांच्या सहमतीने आपले वाहन पुलावर थांबवून तिघेही पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले.
यापैकी अजमद धमनगावे हा नदीच्या कडेवरील भागात पोहत होता, तर नवाज आणि इफ्तेकार हे दोघे नदीच्या मधोमध पोहत गेले. डबक्यात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या दोघांचा पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच कासराळी आणि बिलोलीच्या युवकांनी शर्थीचे प्रयत्न करुन मृतदेह पाण्याबाहेर काढले. ऐन तारुण्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.