सिंधुदुर्ग: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मध्यप्रदेश सरकारला ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भाजपने (bjp) राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून फैलावर घेतलं आहे. त्यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी थेट भाजपवरच हल्ला चढवला आहे. मध्यप्रदेशला जो न्याय मिळाला तोच न्याय महाराष्ट्रात मिळू शकेल. ओबीसी आरक्षणाचे निकष मध्यप्रदेश राज्याला लागले, तो निकष समोर ठेवून ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार नक्की पाठपुरावा करेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही हे न्यायदेवतेच्या हातात आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन वर्षांपूर्वी बोलले होते. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे फडणवीस यांच्याबाबत मी अधिक बोलणं योग्य नाही, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजच्या बांधकामाला 572 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ही मंजूरी दिली आहे. सिंधुरत्न योजनेतून आणखी 150 कोटी रुपये अधिकचे द्यावेत ही मागणी जिल्हा नियोजनमधून करण्यात आली आहे. प्राधिकरणातील दहा हेक्टर जागेचा प्रस्ताव नगरविकास खात्याला दिला गेलायय याच ठिकाणी सिंधुदुर्गचे शासकीय मेडिकल कॉलेज उभं रहाणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
खासदार संभाजी छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं. राज्यसभेच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. त्याबाबतचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. संभाजी छत्रपतींना बोलवायचं हा अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. उद्धव ठाकरे ज्यांना उमेदवारी देतील त्यांना शिवसेना निवडून आणेल, असं त्यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला की नाही माहीत नाही. पण आदित्य ठाकरे हे येत्या 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
भाजप नेते नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीवरून टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. विरोध केल्याने काम करण्याची उमेद आणखी वाढते. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत विरोधकांची देखील कामे घ्यावीत अशा सूचना दिल्या आहेत. नियोजन हे विकासाचे मंडळ आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण, टीकेच्या वेळी टीका करू. पण सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
43 कोटी परत कोणी पाठवले? हा सर्व निधी जिल्हा परिषदेचा आहे. हे पैसे जिल्हा परिषदेकडून परत पाठवण्यात आले. जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची आहे. त्यामुळे हे कुणाचे अपयश आहे?, असा सवाल करतानाच त्यामुळेच प्रशासनावर वचक असणारा भगवा आता जिल्हा परिषदेवर फडकवावा, असं मी आव्हान करतो असं ते म्हणाले.