रत्नागिरीत जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांची प्रकृती बिघडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अखेर या घटनेची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. माजी मंत्री उदय सामंत यांनी या घटनेची दखल घेतली आहे. उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे. “अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली गेलीय. आजच केस दाखल केली जाईल. निष्काळाजीपणामुळे वायूगळती झाली. कंपनीने दिलेली आश्वासन आणि त्याची परिपूर्णता याचा अहवाल देखील समितीने द्यावा. कंपनीकडून काय मिळते याबाबत नागरिकांनी देखील सजग राहावे. कंपनीकडून सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी ग्रामस्थांनी सजग पाहिजे. ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा कंपनी उठवू नये यासाठी समिती स्थापन केली आहे. कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. कंपनीच्या मालकाने देखील कधीतरी रत्नागिरीमध्ये यायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये कंपनी दोषी आहे”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली. “मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मंत्र्यांची नावं ठरली आहेत, तर त्याची नावे सांगा. मी आता अभिनंदन करतो”, असं उदय सामंत म्हणाले. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही. तसं काही असेल तर लवकर कळेल. आम्ही तत्त्वाने शरद पवार यांचे विरोधात. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान आहे”, असंदेखील उदय सामंत यावेळी म्हणाले.
“मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता नक्की येणार आहे. महायुतीचे हिंदुत्व बेडगी असते तर आम्ही 234 वर गेलो असतो का? पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे”, असं म्हणत उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. “हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात झालेल्या आंदोलनात उबाठा कुठे सामील होते? महायुती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणार म्हणजे जिंकणार”, असंही उदय सामंत म्हणाले.
यावेळी उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनादेखील प्रतिक्रिया दिली. “विरोधक म्हणून काही चांगले सल्ले दिल्यास स्वीकारले जातील. मुद्दा करायला आता कोणत्याच निवडणुका नाहीत”, असं उदय सामंत म्हणाले. “कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार”, असं उदय सामंत म्हणाले.