मविआकडून कोल्हापुरातल्या शाहू छत्रपतींचं नाव खूप दिवस आधीच पक्कं झालं. मात्र दुसरीकडे महायुतीकडून सातारच्या उदनयराजेंच्या उमेदवारीबाबत अद्यापही सस्पेन्स आहे. एकीकडे कोल्हापूरच्या राजेंना ३ पक्ष घरी येवून उमेदवारीचा आग्रह धरतायत आणि दुसरीकडे सातारच्या उदयनराजेंना तिकीटासाठी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करावा लागतोय, असं म्हणत ठाकरेंच्या युवासेनेनं भाजपवर टीका केलीय. आरोपांनुसार गेली ३ दिवस उदयनराजे तिकीटासाठी दिल्लीत आहेत. पण अमित शाहांची त्यांची भेट होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे विरोधकच नव्हे तर खुद्द भाजपचे नरेंद्र पाटील सुद्धा याबद्दल खंत व्यक्त करतायत. तर विरोधकही भाजपवर निशाणा साधत आहेत. उदयनराजे भाजप मध्ये प्रवेश करताना मोठा कार्यक्रम घेतला मात्र आज दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी त्यांना तीन दिवस ताटकळत बसावं लागतंय, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
गेल्यावेळी साताऱ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत सामना झाला. यावेळी अजित पवारांच्या रुपानं राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटलांचं नाव चर्चेत आहे. मात्र गेल्यावेळी ही जागा भाजपनं लढवल्यानं उदयनराजेंचे समर्थकही जागा सोडण्यास इच्छूक नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, यावर उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर लढावं, अशी मागणी अजित पवार गटाकडून केली गेली. पण उदयनराजे त्यासाठी तयार नाहीत. आता सातारच्या जागेसाठी बैठकांचा सिलसिला कसा घडला? ते समजून घेऊयात.
यंदा निवडणूक लढण्याबाबत 19 फेब्रुवारीला उदयनराजेंनी पहिल्यांदा संकेत दिले. 13 मार्चला भाजपच्या पहिल्या यादीत उदयनराजेंचं नाव आलं नाही. 15 मार्चला उदयनराजे समर्थकांनी भाजपला इशारा दिला. 16 मार्चला सकाळी खुद्द उदयनराजेंनी आपण राजकारणातून संन्यास घेतला नसल्याचं विधान केलं. त्याच दिवशी दुपारी 12 च्या दरम्यान भाजपच्या नरेंद्र पाटलांनीही तिकीटाची इच्छा व्यक्त केली. 2 दिवसांनी म्हणजे 18 मार्चला भाजपच्या गिरीश महाजनांनी साताऱ्यात उदयनराजेंची भेट घेतली. 20 तारखेला उदयनराजे मुंबईत येवून फडणवीसांना भेटले. नंतर 21 ते 23 असे 3 दिवस उदयनराजे दिल्लीत मुक्कामी राहिले. आणि त्यादरम्यान म्हणजे 22 तारखेला साताऱ्यातील उदयनराजेंचे विरोधक मानले जाणारे शिवेंद्रराजे मुंबईत फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत प्रश्न विचारला असता, उदयनराजे काय करतायत त्याचं मला माहिती नाही, शिव शाहु फुले आंबेडकर म्हंटलं की विषय संपला आमच्यासाठी, उदयनराजे काय करतायत त्याच्याशी मला घेणं देणं नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. तर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनादेखील उदयनराजे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, उदयनराजे मोठे नेते, छत्रपती त्यांना उमेदवारीची तिकिटाची वाट पाहण्याची गरज नाही. ते वैयक्तिक कामासाठी त्या ठिकाणी गेले असतील, असं संजय शिरसाट म्हणाले.