शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला केला. शिवसंवाद मेळाव्यात बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचे शैल्य दाखवून दिले. गद्दारांमुळे आपला पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. हा पराभव म्हणजे वैजापूरला लागलेला कलंक आहे. भगव्याला लागलेला कलंक आहे. शिवसेनाला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढण्याची वेळ आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगर लोकसभा मतदार संघात आपण हरलो आहे. त्याची रुखरुख मला अजूनही आहे. हा पराभव गद्दारांमुळे झाला. लोकांनी संभाजीनगरात धनुष्यबाणाला मतदान केले. कारण त्यांना वाटले धनुष्यबाण असलेली हीच शिवसेना खरी शिवसेना आहे. कारण त्यांनी बाळासाहेबांचे नावही चोरले होते. त्यामुळे धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे नाव पाहून ते मतदान झाले, परंतु आता घराघरात मशाल पोहचवा. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महायुतीचे या सरकारकडून राहिलेली देणी मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांना हक्काचे देत नाही आणि भीक देत आहेत. त्यांची भीक नको. आता त्यांना चलो जाव म्हणण्याची वेळ आली आहे, असा उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. १५०० रुपयांत घर चालते का? कोणत्या बहिणीला विचारला, असे ते म्हणाले.
महायुतीचे सरकार दोन महिन्यांचे सरकार आहे. आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे. तोपर्यंत शेवटच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घेतला तर त्यांना पाठिंबा देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेले होते. त्यावेळी सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही, हे महत्वाचे आहे. माझे न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण उशिरा मिळालेल्या न्यायास न्यास म्हणता येईल का? आता जनतेच्या न्यायालयात त्यांचा निकाल लागणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.