महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवावं; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल

| Updated on: May 12, 2024 | 7:50 AM

घर फोडणं, पक्ष फोडणं हे तर कौरवांचं काम आहे. ही कौरवनीती आहे, ते हरणार आहेत. कौरव त्यावेळी 100 होते. पांडव पाचच होते. पाच पांडवांनी कौरवांवर मात केली होती. त्यामुळे पांडव सत्याच्या बाजूने होते. त्यामुळेच श्रीकृष्ण पांडवाच्या बाजूने होते, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवावं; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यात फिरत आहेत. उद्या ते गल्लीतही फिरतील. त्यांनी गल्लीतही रॅली करावी. त्यांनी महाराष्ट्र बघावा. महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं, असा जोरदार हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

माझ्या छातीवर मशाल आहे. जनतेच्या हृदयात मशाली पेटल्या आहेत. लोकांच्या मनात आग आहे. मोदींना महाराष्ट्रांनी निवडून दिलं. भरभरून खासदार दिले. तुम्ही फक्त शिवसेनेचा घात नाही केला. तर महाराष्ट्राचा घात केला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे मोदींनी आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले. येऊ घालणारे उद्योगही गुजरातला नेले. मी मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांची उद्योग पळवण्याची बिशाद नव्हती. आमचं सरकार पाडल्यानंतर त्यांनी गद्दारांना सोबत घेऊन उद्योग फिरवले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

थापा उघड

गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. 2014मध्ये ते जे काही बोलले, ते त्यांना 2019मध्ये आठवत नव्हतं. 2019मध्ये जे बोलले ते आज आठवत नाही. आज जे बोलले ते उद्या आठवणार नाही. त्यांना वाटतं त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असला तरी जनतेच्या झाला असं नाही. जनता 10 वर्ष मूर्ख बनली. तुम्ही कदाचित सर्वांना एकवेळ मूर्ख बनावल. पण सदैव मूर्ख बनवू शकत नाही. जनता पेटलेली आहे. उठलेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भेकडांची अवस्था काय?

यांनी थापा मारल्या. यांच्या भाकडकथा होत्या. या भूलथापा होत्या. हे लोक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्तेत आले आणि सर्वाधिक भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत आहेत. महाराष्ट्रात गद्दारी झाली. महाराष्ट्र ही गद्दारी सहन करत नाही. महाराष्ट्राने गद्दारी कधीच सहन केली नाही. आता 300 ते 400 वर्ष झाली. अजूनही खंडोजी खोपडे याचं नाव घेतलं गद्दारीसाठीच घेतलं जात आहे. 300 ते 400 वर्षानंतरही त्यांच्या माथी असलेला गद्दारीचा शिक्का पुसलेला नाही. तिथे या भेकडांची काय अवस्था आहे?, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांची चढवला.

निवडणूक महाभारतासारखी

आताची निवडणूक ही महाभारतासारखी सुरू आहे. त्यावेळच्या महाभारतात द्रोपदीचं वस्त्रहरण झालं होतं. आताच्या महाभारतात लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे. म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. स्वातंत्र्य लढा एक वेगळा भाग होता. त्यात आपण नव्हतो. त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्य गाजवून स्वातंत्र्य दिलं आहे. ते टिकवलं पाहिजे. लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहे. संविधान पाळलं जात नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझा अभिमन्यू? बरोबर आहे. तो शूर होता. भेकड नव्हता. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकत आहेत. ही भेकड माणसं आहेत. यांना अभिमन्यू सारखं लढायचं धैर्य नाहीये. तो चक्रव्यूहात घुसला होता. हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकांशी लढवत आहेत. त्यांनी शिवसेना फोडली. भांडणं लावली. राष्ट्रवादी फोडली. म्हणजे कुटुंब फोडलं. पक्षामध्ये भांडणं लावली. कलह निर्माण केला, अशी टीका त्यांनी केली.