रत्नागिरी – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलत आहोत, असे विधान केले आहे रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मंत्रीपदी राहिलेले रामदास कदम सध्या एकनाथ शिंदे गटात आहेत. रत्नागिरीत त्यांनी उद्धव ठारे यांच्यावर हा सनसनाटी आरोप केला आहे. मराठा व्यक्ती (Maratha)मोठा झालेला त्यांना आवडत नाही, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली आहे. या पार्श्वभूमीर रामदास कदम यांनी केलेल्या या आरोपामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर गेल्या काही महिन्यांपासून 50 खोके गेल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यावरुन विधानसभेच्या पायऱ्यांवर रणकंदन झाल्याचेही पायला मिळाले होते. या टीकेवरही रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मातोश्रीवर गेलेल्या 100 खोक्यांचा हिशोब यांना द्यावाच लागेल अशी टीका त्यांनी त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. मातोश्रीवर कितीही मिठाईचे खोके गेले तरी त्यांना कधीही डायबिटीज होत नाही, असा टोलाही कदम यांनी यावेळी लगावला आहे. हा सगळा आपला इतक्या वर्षांचा अनुभव असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी बेइमानी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत असेही रामदास कदम म्हणाले आहेत.
यावेळी रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांचे वय आत्ता 31 वर्षे आहे, त्याचवेळी आपले राजकीय वय 52 वर्षे आहे, असे रामदास कदम म्हणाले आहेत. यावेळी आपले वय काय, आपण काय बोलतो आहोत, आपण ठाकरे कुचुंबातील आहोत, याचे भान आदित्य यांनी ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे हे तीन वेळा केवळ मंत्रालयात आले, याची गिनीज बुकात नोंद झाल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन सगळा कारभार केल्याची टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गुवाहाटीत जेव्हा शिंदे सोबतचे आमदार होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, राष्ट्रवादीची साथ सोडा, मात्र त्यांनी ऐकले नाही अशी टीका त्यांनी केली आहे. खरे गद्दार कोण आहे हे भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सांगणार असल्याचे कदम यांनी सांगितले.