निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, सिंधुदुर्ग | 4 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याआधीच आपल्याला बंडाची खबर लागली होती, असं स्पष्ट करणारं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. “आमदार जात असताना मला कळाले नव्हते का? मिंध्याची दाडी पकडून आणता आले नसते का? पण मी जेवढे सडके आहेत तेवढ्यांना जावू दिलं”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी त्यांनी मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. “शेजारचे हे… खाली मान पाताळधुंडी”, अशी टीका ठाकरेंनी मंत्री दीपक केसरकर यांची केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात आले. वाटलं काहीतरी देऊन जातील. पण दिले काहीच नाही. याउलट जो पाणबुडीचा प्रकल्प येत होता तो गुजरातला घेऊन गेले. गुजरातचं प्रेम ठिक आहे. तुमच्याकडे ठेवा. आमचंही गुजरात आहे. भूचला भूकंप झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? हल्लीच तुमचा उदय झाला. असाल देखील… जसं फडणवीस म्हणतात बाबरी पाडली तेव्हा होते तसं असेल”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
“मी आज कोंबडी वडे खाल्ले. याच्यावर काय बोलणार, याची लायकी नाही. दुसरी गटार गंगा असेल तर मी काय करू ही गटार गंगा आहे”, असं म्हणत त्यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. “मागे पंतप्रधान म्हणाले होते. मैं दो तीन किलो गालिया खाता हूँ. मग हे तुमची दोन-तीन भोकं पडलेली. तीनपाट लोकं आम्हाला काय सकाळपासून गुलाबजामुन देतात?”, असा सवाल ठाकरेंनी केला.
“मुस्लिम लोक देखील इथे आले आहेत. त्यांना कळून चुकलं आहे की आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं आहे, भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे”, अशी टीका ठाकरेंनी केली. “मला संपवायला निघाले. मला राजकारणातून संपवताहेत. हिंमत असेल तर या अंगावर. ही माझी संपत्ती आहे. भाजपला आव्हान आहे. या मैदानात. पण तुमची घरगडी ईडी सीबीआय बाजूला ठेवा. बघू कोण पाठीला माती लावतं ते”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
“आम्ही भाजपमुक्त श्रीराम म्हणतोय. भाजपला कुणी तारले असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी. जर शिवसेनाप्रमुख मागे राहिले नसते तर अटलजींनी तुम्हाला कचऱ्याच्या पेटीत टाकले असते. तुम्ही त्यांच्या मुलाला संपवायला निघाला आहात. मर्दानगी शिल्लक असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या. मग बघूया, असा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. “विश्वगुरू आहात, सर्वात मोठा पक्ष असेल. 400 पार होणार असेल तर मग कशाला पक्ष फोडता? झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या शिवसैनिकांकडे ईडी गेली होती. प्रशासकीय ताकद ही तुमची वैयक्तीक ताकद नाही. ती जावू दे मग बघा”, असं ठाकरे म्हणाले.
“गणपत गायकवाड यांनी परिणामांची चिंता असतानाही गोळ्या घातल्या. त्यांचे स्टेटमेंट ऐका. करोडो रूपये मिंधेकडे आहे. कुणी बोलत नाहीय भाजपवाले. गृहमंत्री आहेत कुठे.. जोपर्यंत सीएम हे आहेत तोवर गुंडांची पैदास होईल असे गणपतराव म्हणाले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“यावेळी त्या टिनपाटाला आणखी भोके पाडायची. परत उभे राहता कामा नये, यांनी शिवसेना सोडली नव्हती. तर हाकलले होते सेनाप्रमुखांनी. भाजपची दया येते. कुणाला पोसताय तुम्ही. आम्ही होतो ना तुमच्यासोबत. शिवसेना एक ढाल म्हणून तुमच्यासोबत होती. सुक्ष्म लघू ही घराणेशाही राहणार नाही का? टीनपाट घराणेशाही राहणार नाही हे मोदींनी सांगावे. कल्याणात गद्दारांची घराणेशाही. सरकारमध्येच गँगवॉर होतंय”, अशी टीका ठाकरेंनी केली.
“तुमची देशी मस्ती आम्ही उतरवणार. तिकडे चीन घुसतोय. पण सगळे जय श्रीराम जय श्रीराम.. घराघरात अक्षता वाटल्या… कुपोषणानं बालके मरत असताना असं अन्न वाया घालवता. देश ज्या दिशेने नेतायत तो हुकुमशाहीचा आहे. अब की बार भाजपा तडीपार. कुणी समजू नये की सत्तेचा अमरपट्टा माझ्याकडे आहे”, असं ठाकरे म्हणाले.