रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेड येथील सभेत केंद्रीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला. “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यांत मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. कोणती शिवसेना आहे ते बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरुन जो हुकूम येतो त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत. हे निवडणूक आयोग म्हणायच्या लायकीचे नाहीत हे मी उघडपणे बोलतोय”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“ज्या तत्वावर शिवसेना त्यांची असं म्हटलं आहे ते तत्वच झूठ आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित त्या ठिकाणी बसले असतील पण ते तुमचे वडील असतील माझे वडील नाहीत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
“जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही नेमकं काय करताय ते तुम्हाला लक्षात येत नाहीय. तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही तर तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यांमध्ये बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. माझे हात आज रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. याच्यासाठी पूर्वजांची पुण्यायी असावी लागते. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमची साथ-सोबत मला पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
“जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?”, असा घणाघात त्यांनी केला.
“तुम्हाला कोण विचारत होतं. भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं. तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्या मागे उभे राहिले नसते तर आज हे कुठे राहिले असते? पण एवढं निष्ठुर आणि निर्घृणपणाने वागत आहेत की, ज्याने सोबत दिली त्यांना पहिले संपवा. बघा प्रयत्न करुन”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
“आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आणलेले आहेत. हो मी शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही. अजिबात नाही. निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव देऊ शकतं. पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.