Baramati constituency : शरद पवारांनी बारामतीत, अजित पवारांच्या विरोधात उघडपणे नेतृत्वावरुन आव्हान उभं केलं आहे. अजित दादांनी 25-30 वर्षे नेतृत्वं केलं. आता नवं नेतृत्वं म्हणून युगेंद्र पवारांना संधी द्या, असं आवाहन पवारांनी बारामतीकरांना दिलं. तसंच स्वत:च्या संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिलेत. बारामतीत अजित पवारांचं नेतृत्वंच बदलण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं. बारामतीत अजित दादांनी 25 ते 30 वर्षे कामं केली. पण आता पुढच्या 30 वर्षांची काम करणारं नेतृत्वं तयार करायचं आहे. त्यासाठीच युगेंद्र पवारांना उमेदवारी दिलीय, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय.
अर्थात आता बारामतीतून अजित पवारांचं नेतृत्व बदला असं आवाहनच शरद पवारांनी केलं. बारामतीत अजित पवारांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचेच पुतणे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि अजित पवारांसह शरद पवारांनीही बारामतीत जोरदार प्रचार सुरु केलाय. युगेंद्र पवारांचा अर्ज भरण्यापासून ते कन्हेरी गावातून प्रचाराची सुरुवातही शरद पवारांच्याच हस्ते झाली. काका पुतण्यामधील राजकीय सामना हा मिक्रिकीपर्यंतही पोहोचला. शरद पवारांनी भर सभेत अजित पवारांची नक्कलही केली.
शरद पवारांनी मंगळवारी एकाच दिवसांत बारामती तालुक्यात 4 सभा घेतल्यात तर अजित पवारांनीही बारामती तालुक्यात गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्यात. 1 आणि 3 नोव्हेंबरला गावांना भेटी देवून छोटेखानी सभा घेत मत देण्याची विनंती अजित पवारांनी केली.
बारामतीतूनच शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. राज्यसभेची खासदारकी संपण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळं पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल असं पवार म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढाईत अजित पवारांचा पराभव बारामतीकरच नाही तर महाराष्ट्रानं पाहिला. अजित पवारांच्या पत्नीला सुप्रिया सुळेंनी पराभूत केलं. आता विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाईत काका पुतण्याचाच सामना होतोय. युगेंद्र पवारांना जिंकवण्यासाठी शरद पवार मैदानात जोरात उतरलेत. अर्थात युगेंद्र अजित पवारांचा जसा पुतण्या आहे तसा शरद पवारांनाचा नातूही आहे.