छोटे मनसे कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई… उन्मेष पाटलांची जोरदार शेरोशायरी; भाजपवर साधला निशाणा

| Updated on: Apr 20, 2024 | 3:03 PM

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपसोडून ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्याला जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील प्रचाराच्या कामाला लागले आहेत. गावा गावात सभा घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत. शेरोशायरी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता ऐकवत उन्मेष पाटील हे भाजपवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत.

छोटे मनसे कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई... उन्मेष पाटलांची जोरदार शेरोशायरी; भाजपवर साधला निशाणा
unmesh patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजपमधून ठाकरे गटात आलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. उन्मेष पाटील यांनी शेरोशायरी करत भाजपला खडेबोल सुनावतानाच अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवत जोरदार हल्ला चढवला आहे. छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता… हे अटलजींचे वाक्य होतं. भाजपमध्ये आता छोटं मन राहिलं आहे. छोट्या मनाने जे राजकारण करतात ते अत्यल्प काळासाठी असतं. दीर्घकाळ राजकारण करण्यासाठी मोठे मन लागतं, असा हल्लाच उन्मेष पाटील यांनी लगावला आहे.

जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील आणि शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव देशमुख चाळीसगावात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. एकेकाळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे आज करण पवार यांच्यासाठी एकत्र प्रचार करताना दिसून येत आहे. यावेळी उन्मेष पाटील यांनी आपल्या खणखणीत भाषणातून भाजवर जोरदार निशाणा साधला आहे.

कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा

उद्धव ठाकरे यांच्यासारखा निर्मळ, निष्कलंक मुख्यमंत्री होणे नाही हे महाराष्ट्रातील 39 टक्के लोकांचं म्हणणं आहे. म्हणून मी ठरवलं कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा. राजकारणात मनाने मोठे असले पाहिजे. म्हणून मशाल हातात घेऊन मी आणि करण पवारांनी ही भूमिका घेतली आहे, असं उन्मेष पाटील म्हणाले.

क्रांती करण्याची वेळ आलीय

राजकारणात सध्या इंग्रजांची नीती अवलंबली जात आहे. राजकारणात नेहमी माणसं तोडली जातात. मन तोडली जातात. पण एका सकारात्मक राजकारणाची चाहूल आपण चाळीसगावमध्ये बघत आहोत. जळगाव लोकसभेवर करण पवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहेत. आता मशालीने क्रांती करण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

टायगर अभी जिंदा है

टायगर अभी जिंदा है, फिर वही दिल लाया हूँ… अशी शेरोशायरीही त्यांनी केली. आपल्याला गरुड झेप घ्यायची आहे. आमदार म्हणजे आम लोकांसाठी दारात जाऊन सेवा करणारं पद आहे. दुर्दैवाने आपले आमदार जमिनीवर नसून लोकांच्या जमिनी घेत सुटले आहेत. लोकप्रतिनिधी हा संवेदनशील असला पाहिजे, लोकांच्या सुखदुःखात कामा येणार असला पाहिजे. अटलजींची भाजप म्हणतात परंतु त्यांचं वाक्य विसरून गेले आहेत. छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता… हे अटलजींचं वाक्य होतं. भाजपला आज त्याचाच विसर पडला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.