राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात गेल्या २४ तासांत मुसळाधार अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाले. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला व बुलढाणा शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे.
अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. वरुड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागात पुन्हा गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संत्रा,कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामूळे चांदुर बाजार तालुक्यातील जमापूर आणि शिरजगाव बंड गावात घरांची मोठी पडझड झाली.
भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस उन्हाळी भात पिकाला नवसंजीवनी ठरला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. खामगाव तालुक्यातील लोखंडा पाळा, गणेशपुर , रोहणासह इतर शिवारामध्ये तुफान गारपीट देखील झाली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतातील रब्बी ज्वारी, कांदा या पिकांसह फळ बागेचे देखील मोठं नुकसान झालं आहे. शिवाय शेगांव, खामगाव तालुक्यासह इतर ठिकाणी पाऊस झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे मका, बाजरी ज्वारी काढणीला आलेले अनेक पीक जमीन दोस्त झाले. बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ही ही वाचा
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा धो-धो पाऊस कोसळणार, सामान्य पावसाचा सलग दुसरा अंदाज