राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. प्रशासन अन् शासन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना शेतमालाचे नुकसान होत आहे. यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आला. अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम असणार आहे. राज्यात 13 ते 15 एप्रिल या तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
13 एप्रिल रोजी मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. या वेळी वादळी वारा आणि गारपीटीचा अंदाज आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे. यामुळे राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही कायम राहणार आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत आज रेड अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासून नागपूरात अवकाळी पाऊस झाला. आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. आज पहाटेपासून विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मागील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला होता. आता त्या तुलनेत पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भात एकीकडे पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असताना त्यावरही पावसाचा फटका बसत आहे.
मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 56 जनावरे दगावली आहेत. संभाजीनगर, बीड जिल्ह्यात पुन्हा गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यात एक हजार तर नांदेडमध्ये 754 हेक्टर शेतीला फटका बसला आहे. अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात अवकाळी आणि वादळी पावसात वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
वाशिममधील शिरपूर व परिसरातील जोरदार पाऊस पडला. मागील तीन दिवसांत परिसरात दोन वेळा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाले पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यासह विदर्भ सीमेवर अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. मंठा तालुक्यतील उस्वद गावात वादळी वारा आणि वादळी वाऱ्यामुळे गावातील शाळा आणि घरावरची पत्रे उडून गेली. अचानक झालेल्या या पावसामुळे फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.