जी गोष्ट चुकीची असते ती चुकीचीच असते. आपण चुकांमधून शिकायचं असतं. पण काम करत असताना अनावधानाने ज्या चुका होतात, त्या चुकांमधून आपल्याला शिकायला मिळतं म्हणून त्या चुका झाल्यास त्यात गैर असं काहीच नाही. उलट एकदा ठेच लागली की पुढच्यावेळी आपण सजग असतो. त्यामुळे चुकांमधून भरपूर काही शिकायला मिळतं. पण आपल्या स्वार्थासाठी आपण चुकीची पद्धत वापरली तर त्यातून होणारी परतफेड ही तात्पुरती आनंद देणारी जरी असली तरी नंतर त्याचा आपल्याला त्रास किंवा मनस्तापच होऊ शकतो. त्यामुळे चांगल्या मार्गाने मेहनत करुन, प्रचंड कष्ट करुन यश संपादीत करायचं की, क्षणिक सुखासाठी चुकीचा मार्ग अवलंबायचा हे आपलं आपण ठरवायला हवं. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे महाराष्ट्रात सध्या पूजा खेडकर प्रकरण प्रचंड चर्चेत आहे.
सध्या चुकीच्या मार्गाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या अशाच मनस्तापातून जात आहेत. त्यांना आता कदाचित पश्चात्ताप देखील होत असेल. पण आता गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. पूजा खेडकर यांच्याविरोधात आता यूपीएससी खूप मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्याभोवती मोठ्या संकटाचे ढग दाटून आल्याचं सध्याचं चित्र आहे.
पूजा खेडकर यांनी वाशिम सोडलं असून त्या नागपूरकडे रवाना झाल्या आहेत. त्या माध्यमांसमोर फार काही बोलत नाहीयत. पण पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत यूपीएससीने एफआयआर दाखल केला आहे. स्वत:च्या आई-वडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला आहे. तसेच तुमची उमेदवारी का रद्द करु नये? असा सवाल करत युपीएससीने पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यूपीएससीने केलेल्या आरोपांनुसार, पूजा खेडकर यांनी स्वत:चं नाव, आई-वडिलांचं नाव, फोटो आणि सह्या बदलल्या आहेत. आपल्याला भविष्यात युपीएससीची परीक्षा देण्यापासून रोखण्यात का येऊ नये? अशी नोटीस यूपीएससीने पूजा खेडकर यांना पाठवली आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणुकीची केस दाखल केली आहे. पूजा खेडकर यांनी 2022 च्या यूपीएससी परीक्षेत फसवणूक केल्याचं यूपीएससीच्या तपासात उघड झालं आहे. पूजा खेडकर यांनी नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी बदललेली दिल्याने पूजा खेडकर यांना जास्त वेळ परीक्षा देता आली, असं तपासात उघड झालं आहे.