पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना पुढेही सुरुच राहणार आहे. या योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे अनेक वर्ष मंत्री होते. मी दहा वर्ष अर्थमंत्रीपद भूषवलं. लाडकी बहीण योजना आणली. त्यावर टीका करण्यात आली. पण भावांकडे लक्ष नाही असं सांगितलं जातं. अरे शहाण्यांनो कोण म्हणतो भावांकडे लक्ष नाही. आम्ही वीज बील माफ केलं. युवक युवतींना प्रशिक्षणार्थींसाठी वेतन सुरू केलं. हे सरकार सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे.
सामान्य जनतेचा विचार करणारं सरकार आहे. या योजनेला काही जणांनी विरोध केला. कोर्टात गेले. त्यातही ते टिकलं नाही. आता महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आता ही योजना तात्पुरती आहे अशी चर्चा सुरू केली. आमचे पाच महिने बाकी आहे. साडे सात हजार रुपये तुम्हाला मिळतील. पुढेही सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे.
‘तुम्ही पुन्हा महायुतीला पाठबळ द्या. पुन्हा संधी द्या. पुढच्या पाच वर्षात तुम्हाला ९० हजार देण्याचं काम करणार आहोत. आम्ही कामाचे माणसं आहोत. शब्दाला पक्के आहोत. जे बोलतो ते करतो. वेळ मारून नेणारे नाही. विरोधक अधूनमधून टीका करतात. त्याकडे लक्ष देऊ नका. लोकसभेतही संविधान बदलणार असं खोटंनाटं सांगितलं. आता त्याला बळी पडायचं नाही. हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. ते परत घेण्यासाठी दिलेले नाही. हा तुमचा हक्क आहे. अधिकार आहे. त्यामुळे कोणी काय बोलत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना सरळ सांगा, ए त्या दिवशी तिन्ही भावाने सांगितलं काही काढून घेणार नाही. ही ओवाळणी आहे. ती आम्हालाच राहील.’
आज १ कोटी ८ लाख लोकांचे अर्ज मंजूर झाले. १ कोटी ३ लाख लोकांना पैसे मिळाले. आम्ही मदत करण्यासाठी त्यांना सबल करण्यासाठी या योजना घेतल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. खुल्या मैदानात कार्यक्रम घ्यायची मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. पण पावसाने अडचण येऊ शकते म्हणून हा कार्यक्रम इथे घेतला. काळजी घ्या. या पैशाचा विनियोग करा. असं ही अजित पवार यांनी म्हटलं आहे.