मुंबईः केशव उपाध्येंनी डोळे उघडून अंध भक्तासारखे बघू नये. त्यांच्यामध्ये जर दम असेल, तर व्हिडिओ घेऊन यावं. सिद्ध करून दाखवावं, असं म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज उपाध्ये यांना खुले आव्हान दिले. शिवाय ज्या लोकांनी त्यांची मातृ संघटना संघामध्ये कधी पन्नास वर्ष शिवरायांचा फोटो लावला नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. अशा प्रकारची बदनामी त्यांनी करू नये, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
नेमके प्रकरण काय?
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराजांच्या पुतळ्याच्या गळ्यात हार घालण्यासाठी पुतळ्याच्या भागावरच पाय ठेवला. यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महाआघाडी सरकारमधील मंत्री @VijayWadettiwar यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला…@OfficeofUT काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? pic.twitter.com/Ire1qbJ798
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
वडेट्टीवार म्हणतात खोडसाळपणा…
केशव उपाध्ये यांच्या आरोपांचा आज वड्डेट्टीवारांनी पुरता समाचार घेतला. ते म्हणाले, हा पूर्णतः खोडसाळपणा आहे. केशव उपाध्येंनी डोळे उघडून अंध भक्तासारखे बघू नये. मी शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना महाराजांच्या शेजारी माझा पाय आहे. पायावर पाय नाही. जरा अंधभक्त बनू नका. अंधळेपणाने बोलू नका. मी चॅलेंज करतो उपाध्येला. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. संपूर्ण क्लिप आहे. आपणही बारकाईने पाहिला तर दिसेल. पायाशेजारी माझा पाय आहे, असा दावा त्यांनी केला.
माझी हाइट कमी आहे…
मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की, माझी हाइट कमी आहे. मात्र, भाजपकडून हा मुद्दामहून खोडसाळपणा सुरूय. भारतीय जनता पक्षाचे काही विद्रुप लोक, काही द्वेष्टे लोक मुद्दाहून छत्रपती शिवरायांच्या संदर्भात माझं नाव जोडून बदनामी करण्याचं काम करतायत. मी स्पष्टपणे सांगतो हा खोडसाळपणा आहे. त्यांच्यामध्ये जर दम असेल, तर व्हिडिओ घेऊन यावं. सिद्ध करून दाखवावं. ज्या लोकांनी त्यांची मातृ संघटना संघामध्ये कधी पन्नास वर्ष शिवरायांचा फोटो लावला नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. अशा प्रकारची बदनामी त्यांनी करू नये, ही माझी त्यांना विनंती आहे आणि आव्हानही आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
इतर बातम्याः
Omicron in Aurangabad: दुबईहून आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक निगेटिव्ह, औरंगाबादला आणखी कशाची चिंता?