सगेसोयरे ही भेसळ; प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा?

| Updated on: Jul 16, 2024 | 4:41 PM

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेच्या मागणीवर टीका केली. सगेसोयरे ही भेसळ आहे, असं प्रकाश आंबेडकर स्पष्ट म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

सगेसोयरे ही भेसळ; प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा?
प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली होती. या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. प्रकाश आंबेडकर एससी, एसटी आणि ओबीसींच्या हक्कांसाठी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. येत्या 25 जुलैपासून दादर चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं. याच पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला.

“राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असं ओबीसींचं मत होत आहे. हे सर्व लोक श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असं ओबीसींना वाटतंय. हा धोका आहे. दुसरीकडे जरांगे म्हणत आहेत की, आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कोणतंही सरकार निर्णय घेणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘जरांगेंचं आंदोलन श्रीमंत की गरीब मराठ्यांसोबत की ३१ खासदारांसोबत?’

“मनोज जरांगे यांचं आंदोलन गरीब मराठ्यांचं आदोनल आहे. ते जरांगे यांना पाठिंबा देत आहे. पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. त्यांचं आंदोलन कुठे जाईल, कसं जाईल हे सांगता येत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलनं ही श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झालं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच आंदोलन भरकटलंय असं म्हटलं नाही. म्हणणार नाही. पण मनोज जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ते श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत की, ३१ खासदारांसोबत आहेत की गरीब मराठ्यांसोबत आहेत? याचा विचार करावा लागणार आहे”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

‘सगे सोयरे ही भेसळ’

“सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची आहे. ते श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळूच नये असा त्यांचा प्रयत्न आहे. याचा तोडगा मी आता मांडणार नाही. मांडला तर त्याचा खिमा करतील. सत्ता आल्यावर तोडगा देईल. पण आता भेसळ करण्याचा भाग सुरू आहे. सगे सोयरे ही भेसळ आहे. प्रत्येक पार्टीला पत्र लिहा या दोन विषयावर. जरांगेची मागणी आहे, मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्या आणि सगेसोयऱ्यांबाबतची भूमिका काय हे राजकीय पक्षांना पत्रातून कळवा असं सांगितलं”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.