वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा कळमनुरी पोलीस ठाण्याला घेराव

| Updated on: Nov 19, 2024 | 9:33 PM

मध्यरात्री कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेमध्ये दिलीप मस्के यांना जबर मारहाण करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा कळमनुरी पोलीस ठाण्याला घेराव
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा कळमनुरी पोलीस ठाण्याला घेराव
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदान सुरु होण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पण मतदानाला एक दिवस बाकी असताना आज अनेक ठिकाणी उमेदवारांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल दगडफेक झाली. या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झाले. त्यानंतर पुण्यात वडगाव शेरी येथे शरद पवार गटाला पाठिंबा दिलेल्या नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाला. तसेच काल अमरावतीत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भाजप आमदाराच्या बहीणीच्या गाडीवर दगडफेक झाली. तर गंगापुरात अपक्ष उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाला. तसेच कल्याण पूर्वेतही ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती आहे. या घटना ताज्या असताच कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी कळमनुरी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्यरात्री कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेमध्ये दिलीप मस्के यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नांदेड येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आज सकाळी या हल्ल्या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये पाच अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर आज दिलीप मस्के यांचे समर्थक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कळमनुरी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरोपीला तत्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “या हल्ल्यामागचा सूत्रधार शिवसेनेच उमेदवार संतोष बांगर असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.