वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वंचितकडून राज्यात येत्या 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 2004 पासून EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांकडून यापुढच्या सर्व निवडणुका या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावात गावकऱ्यांना ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा संशय आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचं ठरवलं आहे. गावकऱ्यांनी सर्व गावकऱ्यांना विधानसभेला ज्या उमेदवाराला मदतान केलं त्यालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.