महेंद्र जोंधळे, लातूर | दि. 12 मार्च 2024 : देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ट्रेन कोणती? हा प्रश्न आल्यावर सर्वांचे उत्तर वंदे भारत असणार आहे. ‘मेक इन इंडिया’, असणारी ही ट्रेन महाराष्ट्रात तयार होत आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात 180 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी लातूरमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मराठवाड्याचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या हा प्रकल्प देशाला वंदे भारत ट्रेन देण्यासाठी महत्वाचा वाटा उचलणार आहे.राज्यातील 56 स्टेशनचे आधुनिकरण होत आहे.
365 एकरावर हा मराठवाडा रेल्वे कोच कारखाना उभारण्यात आला आहे. यासाठी मांजरा साखर कारखान्याने आपली 16 एकर जमीन कोच फॅक्टरीसाठी दिलेली आहे. या कारखान्यातून 180 वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या कारखान्यात रशियन कंपनी बरोबरच भारतीय रेल निगमच्या माध्यमातून बोगी तयार करण्याचे काम चालणार आहे. साधरणतः 58 हजार कोटी रुपयांचा निधी या कारखान्याला देण्यात आला आहे. या कारखान्यामुळे स्थानिक रोजगाराची संधी निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या कारखान्याची संकल्पना मांडत ती पूर्णत्वास नेली. त्या नंतर खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या कारखान्यासह देशातील अनेक रेल्वे प्रकल्प आणि दहा वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रेल्वेच्या इतिहासात एवढं मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल. 100 वर्षात पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. देशातील कानाकोपऱ्यात योजनांचे लोकार्पण केले जात आहे. नवीन योजना सुरू होत आहे.
देशात 85 हजार कोटींच्या रेल्वे योजना सुरु झाल्या आहेत. 2024 मध्ये 75 दिवस झाले आहेत. या दिवसांत 11 लाख कोटी रुपयांच्या योजनाचे लोकार्पण झाले आहे. मागच्या 10 – 12 दिवसांत 7 लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
रेल्वे आरक्षणासाठी पूर्वी मोठी लाईन होती. त्यासाठी दलाली होत होती. हा सर्व प्रकार आपण थांबवला. रेल्वेच्या दहा वर्षात आधीच्या बजेटपेक्षा 6 पटीने बजेट आम्ही वाढविला आहे. हे 10 वर्षाचं काम म्हणजे एक ट्रेलर आहे. आणखी काम बाकी आहे. खूप पुढे जायचं आहे.
वंदे भारत ट्रेनचे शतक लागले आहे. हरिद्वारला कुंभ मेळा होत आहे. वंदे भारत रेल्वेच महत्त्व अधिक वाढणार आहे. आमच्या या प्रयत्नांना काहीं लोक राजकीय चष्म्यातून बघतात. हे कार्य राजकीय दृष्ट्या नसून देशाच्या विकासासाठी आहे. आधीच्या पिढीने जे भोगल ते येणाऱ्या पिढीने भोगू नये, ही मोदींची गॅरंटी आहे.