ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांना मिळू शकतं आमदारकीचं तिकीट

| Updated on: Jul 09, 2024 | 10:43 PM

वसंत मोरे यांनी 3 महिन्यात दुसरा पक्ष प्रवेश करत उद्धव ठाकरेंचा हात पकडला आहे. पण यावेळी त्यांनी राज ठाकरेंना धक्का दिलाय. पुण्यातील मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभाग अध्यक्षांनाही मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत आणलं.

ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांना मिळू शकतं आमदारकीचं तिकीट
Follow us on

मनसे व्हाया वंचित आघाडीनंतर वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर 3 महिन्यातच, मोरे दुसऱ्या ठाकरेंकडे आले आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधून घेतलं. मातोश्रीवर पक्ष प्रवेश करण्याआधी, वसंत मोरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. 100 गाड्यांच्या ताफ्यासह मोरे मुंबईत दाखल झाले. तर पक्षप्रवेशानंतर वसंत मोरेंनी आपण स्वगृही परतल्याचं म्हटलं आहे.

वसंत मोरेंना आमदारकीचं तिकीट

महाविकास आघाडीत पुण्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा सुटू शकते. वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढू शकतात. खडकवाल्यातून तिकीटाचे संकेत उद्धव ठाकरेंनीही दिले आहेत. खडकवाल्यातून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे सचिन दोडके इथून लढले होते. आणि दोडके शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळं मविआत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटू शकते.

जर खडकवाल्यातून ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटली नाही तर हडपसरची जागा मिळू शकते. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे इथून आमदार झालेत. तुपे अजित पवारांसोबत आहेत.

लोकसभेत पराभूत

राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर, वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमध्ये गेले. आणि पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली. पुणे लोकसभेतून वसंत मोरेंना अवघे 32 हजार 12 इतकी मतं मिळाली. त्यामुळं आपल्याला वंचितच्या अनेक लोकांनी स्वीकारलं नाही, अशी प्रतिक्रिया मोरेंनी दिली होती. त्यामुळं निवडणूक होताच मोरेंनी महिन्याभरात प्रकाश आंबेडकरांनाही सोडलं.

आता आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं मोरेंचं म्हणणं आहे. मनसेचे 17 शाखाध्यक्षांसह 5 उपविभाग अध्यक्षांना घेवून वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आलेत…वंचितमध्ये जाताना मात्र वसंत मोरे एकटेच अकोल्यात जावून पक्षप्रवेश घेतला होता. पण उद्धव ठाकरेंसोबत जाताना मनसेला वसंत मोरेंनी धक्का दिलाय. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एवढी ताकद नाही. त्यामुळं वसंत मोरेंच्या रुपानं एक नेता उद्धव ठाकरे यांना मिळाला आहे.

वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ निवडून आले आहेत.