नाशिक : हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिकमधील एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य (Shankaracharya) यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं.
कर्नाटकातील किष्किंदा मठाधिपती महंत गोविंददास महाराज यांनी किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचं म्हटलंय. त्यावर महंत गोविंददास महाराज हे आपल्या दाव्यावर ठाम राहत त्यांनी नाशिकच्या साधू महंतांना आव्हान दिलं. इतकंच नाही तर ते शास्त्रार्थासाठी नाशिकमध्ये दाखलही झाले. मात्र, आज शास्त्रार्थ सभा सुरु होण्यापूर्वीच सभेतील आसनस्थळावरुन वाद रंगला. आसनव्यवस्थेमध्ये जेष्ठ-कनिष्ठतेनुसार काही महंतांचा अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. महंत गोविंददास यांनी ज्येष्ठ महंतांच्या आसनावर बसू नये यावरुन वादाला सुरुवात झाली. त्यामुळे शास्त्रार्थ सभेत काही काळ तणावर पाहायला मिळाला.
शास्त्रार्थ सभा सुरु झाल्यानंतर नाशिकमधील महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य यांचा काँग्रेसी असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर महंत सुधीरदास महाराज यांनी महंत गोविंददास महाराज यांच्यावर माईकही उगारला. त्यानंतर मात्र, शास्त्रार्थ सभेत मोठा राडा पाहायला मिळाला. जगद्गुरुंचा अपमान केल्याप्रकरणी महंत सुधीरदास यांनी माफी मागावी अशी आक्रमक मागणी करण्यात आलीय. त्यानंतर शास्त्रार्थ सभेत मोठा राजा पाहायला मिळाला.