संतोष जाधव, धारशिव, दि.23 डिसेंबर | राज्यात मराठा आरक्षणाचा विषय सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन उपोषण केले. त्यानंतर मराठा आरक्षणाचे केंद्र मुंबईनंतर जालन्यातील अंतरवली सराटी झाले. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आरक्षणासाठी अनेक मागण्या करत २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्यभरात दौरे करुन मराठा समाजाच्या सभा घेतल्या. त्यांच्या सभांना लाखोंची उपस्थिती होती. आता २३ डिसेंबर रोजी पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सभा घेत आहे. त्याचवेळी राष्ट्रपतींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राष्ट्रपती मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहे. हे राष्ट्रपती म्हणजे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाही तर तीन वर्ष वयाचा मुलगा आहे. धाराशिव जिल्ह्यातील या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओसंदर्भात अनेक कॉमेंट सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. त्या मुलाचे कौतूक अनेक जण करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील तीन वर्षाच्या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे. या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे मराठा समाजास आरक्षण देण्याची विनंती केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तीन वर्षाचा राष्ट्रपती म्हणतो, ” नमस्कार, मी राष्ट्रपती बोलतो. सरकारला विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. मोदी साहेब, शिंदे साहेब, फडवणीस साहेब, अजित दादा या सगळ्यांना विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. सध्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. जय महाराष्ट्र”.
राष्ट्रपतीच म्हणतात, मराठ्यांना आरक्षण द्या…
कोण आहेत हे…#MarathaReservation #manojjarangepatil pic.twitter.com/8bIGuDM8Az— jitendra (@jitendrazavar) December 23, 2023
राष्ट्र्पती दत्ता चौधरी या मुलाचा जन्म 19 जून 2020 रोजी झाला आहे. त्याचे नाव राष्ट्रपती ठेवण्यावरून व त्याचे आधार कार्ड काढण्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता मराठा आरक्षणाच्या व्हिडिओवरुन तीन वर्षांचा राष्ट्रपती चर्चेत आला आहे. राष्ट्रपतीचे वडील दत्ता चौधरी यांनीही मराठा आरक्षणाचे समर्थन केले आहे.