उडत्या छप्पराच्या एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल, गडचिरोलीचे यंत्र अभियंता अखेर निलंबित

| Updated on: Jul 28, 2023 | 9:17 PM

काल सकाळी अहेरी आगारातून सहा वाजता ही बस गडचिरोली साठी निघाली होती परत येत असताना पाऊस सुरू असताना बसच्या छत पूर्णपणे उखडला या बस मध्ये काल दहा प्रवासी होते आणि पावसाचे पाणी आत येत असल्यामुळे प्रवाशांनी छत्री उघडून प्रवास केला.

उडत्या छप्पराच्या एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल, गडचिरोलीचे यंत्र अभियंता अखेर निलंबित
GADCHIROLI MSRTC
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 27 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहीनी म्हटली जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या लालपरीची दुरावस्था दाखविणाऱ्या एका बसचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला होता. यामुळे महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसेसच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाकाळात महामंडळाच्या अनेक बसेस नादुरुस्त झाल्या असून अनेक बसेस तशाच अवस्थेत सेवा देत असल्याचे उघडकीस आले आहे.  या प्रकरणी नादुरुस्त बस सेवेसाठी काढल्याने गडचिरोलीचे विभाग यंत्र अभियंत्यांना महामंडळाने अखेर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच 40 वाय 5494 ही बस गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असताना व्हिडीओ कालपासून समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. या बसच्या वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडलेल्या अवस्थेत हवेत उडताना दिसत होते. अशा धोकादायक स्थितीत बस चालवितानाचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने महामंडळाच्या परिस्थिती विषयी जनसामान्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. विशेष मध्ये अशा बिकट अवस्थेत या बसमधून प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

येथे पाहा व्हिडीओ-

या प्रकरणाची दखल महामंडळाने घेतली आहे. या नादुरुस्त बसच्या दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेत विहीत वेळेत न केल्याने संबधीत विभागाचे यंत्र अभियंता शी.रा.बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करण्यास त्यांना जबाबदार धरुन पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित केल्याचे महामंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे. वाहनाची दुरुस्ती किंवा वाहन बांधणीतील दोष दूर न करता कोणतेही प्रवासी वाहन वापरु नये असे आदेश देण्यात येऊन प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वौच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना दिल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

पन्नास किमी प्रवास केला

काल सकाळी अहेरी आगारातून सहा वाजता ही बस गडचिरोली साठी निघाली होती परत येत असताना पाऊस सुरू असताना बसच्या छत पूर्णपणे उखडला या बस मध्ये काल दहा प्रवासी होते आणि पावसाचे पाणी आत येत असल्यामुळे प्रवाशांनी आणि चालकाने छत्री घेऊन जवळपास 50 किलोमीटर ही बस चालविल्याचे चालक प्रदीप मेश्राम यांनी टीव्ही ९ मराठी चॅनलला सांगितले. जवळपास दोन वर्षापासून ही बस भंगार अवस्थेत असून अनेकदा तक्रार केल्यानंतर कोणती कारवाई या बसवर दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे आरोप चालकाने केला आहे.