महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मविआच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मविआच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. या तीन बैठकांमध्ये 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगरमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्हाला महायुतीचे आव्हान वाटत नाही. कारण
राज्यातील जनतेने या सरकारला नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार आहे, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.
महायुती आणि आमची तुलना करू नका. महायुतीत जागा वाटपावरून मारामारी होत आहे. आमच्याकडे मैत्रीपूर्ण चर्चा होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. सर्वोच्चन न्यायालयाचे न्यायाधीश सी.जे.चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्यांनी गणपतीची आरती केली. त्यावर बोलताना थोरात यांनी देशातील
न्यायाधीशांवरही दबाव असल्याच्या चर्चा सुरु असल्याचे म्हटले.
अजित पवार यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेला देखील त्यांची ही भूमिका आवडली नाही. त्यामुळेच निनावी कार्यकर्त्याने प्रातिनिधिक पत्र पाठवले असेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. एमआयएमने मविआमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपणास काहीच माहिती नाही. ही सर्व चर्चा उच्च पातळीवर झाली असल्याची थोरात यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दल कायमच आपली भूमिका मांडलेली आहे. ते धर्माचा भेद करत नाहीत. ते
चुकीचे वागणारे आणि देश विरोधी मुस्लिमांना विरोध करत असल्याचे थोरात यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना त्यांचे प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे. आम्ही सुद्धा मुस्लिम उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.