लोकसभा निवडणुकीत अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे सर्वच पक्षांमध्ये नाराजीची संख्या वाढली आहे. या नाराजांची समजूत काढण्यासाठी त्यांचे भविष्यात राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. विधानसभा, विधान परिषदेचे लॉलीपॉप देऊन 42 जागांचे गणित सांगितले गेले आहे. शिवसेनेतून ज्यांचे तिकीट कापले गेले आहेत, त्यांना विधानसभेचे तिकीट देणे किंवा विधान परिषेद घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची चर्चा आहे. सध्या विधान परिषदेत 78 जागांपैकी जवळपास अर्ध्या अधिक जागा रिकाम्या आहेत. तसेच जुलै महिन्यात रिक्त होणार आहेत.
विधान परिषदेत राज्यपालांमार्फत 12 जणांची नियुक्ती केली जाते. त्या जागांवर अजून नियुक्ती नाही. या जागांसाठी सत्ताधारी पक्ष राज्यपालांकडे नावांची यादी पाठवते. तसेच जुलै महिन्यात विधानसभेतून विधान परिषदेत पाठवण्यात येणाऱ्या 30 पैकी 11 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जाणाऱ्या 22 सदस्यांपैकी 6 सदस्यांचा कार्यकाळ मे अन् जूनमध्ये पूर्ण होत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 9 जागा यापूर्वीच रिक्त आहेत. शिक्षक मतदार संघातील दोन पदेही जुलै महिन्यात रिक्त होत आहेत. पदवीधर मतदार संघातील दोन सदस्यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे.
रिक्त जागांवर नाराजांची वर्णी लावण्यात येणार आहे. तसेच ज्यांना विधान परिषदेत स्थान दिले नाही, त्यांना विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन देऊन नाराजी दूर केली आहे. अनेक आमदारांना खासदारकीचे तिकीट दिले आहे. त्यांच्या जागी उमेदवार द्यावे लागणार असल्याचे नेत्यांनी नाराजांना सांगितले आहे.
विधानसभेने निवडून दिलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे निलय नाईक, रामराव पाटील, रमेश पाटील आणि भाई गिरकर हे जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीकडून बाबा दुर्राणी, काँग्रेसकडून वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, उद्धव सेनेकडून अनिल परब, शिंदे सेनेकडून मनीषा कायंदे, शेकापकडून जयंत पाटील आणि आरएसपीकडून महादेव जानकर यांचा कार्यकाळ जुलै 2024 मध्ये पूर्ण होत आहे. याशिवाय जळगाव, गोंदिया-भंडारा, पुणे, सांगली-सातारा, यवतमाळ, ठाणे, पालघर, अहमदनगर, सोलापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 9 जागा आहेत.