मुंबईः देशाचे स्वातंत्र्य आणि महात्मा गांधींवर वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. महात्मा गांधींवर भाष्य करण्याची कंगना रनौतची लायकी तरी आहे का, असा सवाल त्यांनी केला. एखादी नाची महात्मा गांधींवर बोलतेय. आज कंगना रनौतबद्दल लोक काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कंगना रनौतनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रनौतचा समाचार घेतला. मात्र कंगनावर अशा शब्दात केलेली टिप्पणी मंत्री वडेट्टीवार यांना भोवण्याची शक्यता आहे.
बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. कंपनाने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले. इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे कंगना रनौत सध्या चर्चेत आहे.
दादर येथील शिवाजी पार्कवर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर भेट दिल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही प्रतिक्रिया दिल्या. साहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एक वेगळीच शक्ती आणि ऊर्जा मिळते. याठिकाणी आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
अमरावती येथील दंगलीप्रकरणी प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सावधगिरीने वक्तव्य केलं. रझा अकादमी आणि भाजपची हातमिळवणी झाल्याचं कळतंय. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही बरीच प्रक्षोभक वक्तव्ये केली आणि ते घरी जाऊन झोपले. याचे परिणाम शहराला भोगावे लागले. त्रिपुरा घटनेनंतर जो मोर्चा निघाला, तो अनधिकृत होता. अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
इतर बातम्या-