मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विभागीय आयुक्तपदी विजेंद्र सिंग (Vijendra Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते आपला मूळ विभाग अर्थात कस्टम डिपार्टमेंटमध्ये रुजू होणार आहेत. विजेंद्र सिंग यांनी मंगळवारी समीर वानखेडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. विजेंद्र सिंग हे आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकारी आहेत.
समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर म्हणून एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होतं.
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ अखेर संपला. त्यांना तिसरी मुदतवाढ नाकारण्यात आली. यामुळे त्यांना आता त्यांच्या मूळ विभागात परत जावं लागणार आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा कार्यकाळ खूपच गाजला. मुंबईत सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण गाजत होतं. त्याच वेळी, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एनसीबीच्या झोनल डायरेक्टरपदी समीर वानखेडे यांची नेमणूक झाली. समीर वानखेडे यांची 30 ऑगस्ट 2020 रोजी नेमणूक झाली होती.
समीर वानखेडेंना पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 30 ऑगस्ट 2021 पर्यंत होती. या कालावधीतही त्यांनी अनेक कारवाया केल्या. यानंतर त्यांना पुन्हा दुसरी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 अशी होती. या कालावधीत ही अनेक मोठ्या केसेस केल्या. नवाब मलिक यांचे जावई समीर खान, शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान, अरमान कोहली आदी अनेक मोठ्या कारवाया केल्यात. मात्र याच कारवायामुळे ते नंतर अडचणीत आलेत.
समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच कारवायांची पुन्हा नव्याने चौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यांची चौकशी सुरू झाली. आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप झाला होता. यामुळे मग समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत दोन विशेष पथक नेमण्यात आली आहेत. एक पथक आर्यन खान याला सोडण्यासाठी पैसे मागण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं तर दुसर पथक समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला होता.