राजकारणात ट्विस्ट, ईव्हीएमच्या पडताळणीच्या पैशांवरुन सुजय विखे यांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 10, 2024 | 4:51 PM

सुजय विखे पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत ईव्हीएमच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण अतिआत्मविश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अमोल खताळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याबाबतही आपले विचार मांडले. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत काँग्रेस नेत्यांवरही टीका केली.

राजकारणात ट्विस्ट, ईव्हीएमच्या पडताळणीच्या पैशांवरुन सुजय विखे यांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
सुजय विखे पाटील
Follow us on

भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. “EVM मत पडतताळणीचे पैसे त्यांचे नाहीत. एका जणाने ते पैसे दिले आणि चार पाच जणांना भरायला लावले. तो कोण आहे हे मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेन”, असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. “महायुतीला मिळालेलं यश हे सर्वसामान्यांनी केल्याच्या प्रयत्नांचं यश आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा सुजय विखे पाटील असं यश नाही तर सर्वांनी संघटीत काम केलंय. त्यामुळे मिळालेलं हे यश आहे. जिल्ह्यात प्रत्येक आमदार तुल्यबळ आणि सक्षम आहे. पक्षाने दिलेली संधी मग ती राधाकृष्ण विखे पाटलांना असो, पालकमंत्री म्हणून 12 पैकी 10 जागा मिळवू शकलो. दोन जागा थोडक्यात वाचल्या. पक्ष जी संधी देईल त्या संधीचं सोनं करण्याची ताकद प्रत्येक महायुतीच्या आमदारात आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.

सुजय विखे पाटील यांना यावेळी अमोल खताळ यांना मंत्रीपदाची संधी मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “संधी मिळण्याची अपेक्षा प्रत्येकाला आहे. अमोलला मिळाली तर त्यात दु:ख वाटायचं काही कारण नाही. त्याने त्याच्या मेहनतीने यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल खताळांना संधी मिळाली तर तालुक्याला देखील आनंद होईल. पण हा निर्णय कोण्या एकट्याचा नाही, तीन नेते मिळून जो योग्य असेल तो निर्णय घेतील. आम्ही संधीची वाट बघत नाही, आम्ही कामाला सुरूवात केली आहे. विकासाला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे”, असं सुजय विखे म्हणाले.

राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद मिळेल का? असा प्रश्न सुजय विखे यांना विचारला असता, “जे मिळालं त्याची कधी अपेक्षा केली नाही. जे मिळालं ते साईबाबांनी पदरात ‌टाकलं आहे. साईंच्या आशीर्वादाने जनतेने आठव्यांदा विखे पाटील परिवाराला काम करण्याची संधी दिली. बाबा जे पदरात देतील ते आम्ही निस्वार्थपणे स्वीकारू, आम्हाला अपेक्षा नसते. निस्वार्थ भावनेने काम केल्यास आपोआप गोष्टी येतात, त्याच भावनेतून काम करतोय”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

सुजय विखे ईव्हीएमबाबत काय म्हणाले?

“मी ईव्हिएमबाबत जो मत पडताळणीचा अर्ज केला त्यात अद्याप प्रक्रिया सुरू झाली नाही. विरोधकांनी मागणी केली कारण त्यांच्या केडरला त्यांना काही तरी सांगणे गरजेचे आहे की, त्यांचा पराभव कशामुळे झाला. वास्तविकता ही आहे की‌, अतिआत्मविश्वास विरोधकांना नडला आहे. संगमनेरमध्ये बांग्लादेशी हिंदुवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कॉंग्रेसने मोर्चा काढला. जेव्हा विधानसभेत अगोदर हिंदू मुलींची छेडछाड झाली होती त्यावेळी ते का जागे झाले नाहीत? तर ही सगळी मतांची बेरीज, लोक हुशार आहेत”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

“लोकांना माहितीय की हे आता काय करायचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेला निवडणूक धर्मावर आधारित झाली त्याचा फायदा त्यावेळी त्यांना झाला. त्यांना फार आनंद वाटत होता. पण विधानसभेत गणितं बदलले. तेव्हा ईव्हीएमला दोष देण्यात आला. EVM पुर्णपणे योग्य आहे. त्यांचे पोलिंग एजंट प्रत्येक बुथवर बसले होते. त्यांनी मतदानाचा आकडा वाचून दाखवला. जो मायक्रो कंट्रोलर प्रोसेसर हा डॅमेज आहे की नाही एवढंच मोजलं जातंय. त्यात VVPAT मोजले जाणार नाहीत. मतदान मोजलं जाणार नाही. या लोकांना ते माहितच नाहीय. फक्त पैसे भरायचे म्हणून भरले. हे त्यांचे पैसे नाहीत. एका जणाने ते पैसे दिले आणि चार-पाच जणांना भरायला लावले. तो कोण आहे हे मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेन”, असं मोठं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.