नाशिकः नाशिकमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात व कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कोरोना निर्बंधांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. त्यात एकीकडे मुख्यमत्री उद्ध ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात आणि सभागृहाबाहेर आणि कोरोनाच्या प्रतिबंधित नियमांचे पालन करा असे कळकळीने सांगत आहेत. मात्र, राजकीय नेत्यांच्या लग्नात याला सोयीस्करपणे फाटा दिला जात आहे. याच कारणाने सर्वसामान्य मंडळीही हाच कित्ता गिरवताना दिसत आहेत.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमध्ये काल एक शाही विवाह सोहळा सायंकाळी पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा हा विवाह सोहळा होता. या सोहळ्याला खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तर दुसरीककडे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाचा नाशिकमध्येच बालाजी लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना नेते संजय राऊत, दादा भुसे यांनी हजेरी लावली. या दोन्ही लग्नाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या नियमांचेही उल्लंघन झाले.
काय कारवाई होणार?
नव्या ओमिक्रॉन विषाणूनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने नुकतेच नवी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, ही नियमावली तयार करण्यात ज्या सरकार नावाचा सहभाग असतो, त्या सरकारमधील आमदार आणि मंत्रीच जर नियमांचे पालन करत नसतील, तर इतरही हाच कित्ता गिरवणार ना. मग या संबंधितावर कारवाई करायला प्रशासन धजावणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नियम काय सांगतो?
राज्यात 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने अतिरिक्त निर्बंध काय असतील, याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. मात्र, या नियमांचे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात व कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात पालन झाले नाही. आता नाशिक पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काही कारवाई करते का, याची उत्सुतका लागली आहे.
शरद पवारांची परंपरा खोटं बोलण्याची, मोदींची पवारांना कोणती ऑफर? वाचा सविस्तर
भाजप नेते हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित, दोन दिवसांपूर्वीच मुलीचा लग्न सोहळा, नेत्यांची चिंता वाढली!