सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार दिला असून प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा संताप अनावर झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा नेहमी काँग्रेसकडे राहिली आहे. मात्र, ठाकरे गटाने कुरघोडी केल्याने काँग्रेसचा इगो दुखावला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. सांगलीची जागा आमची होती, आहे आणि राहीन. सांगलीची जागा काँग्रेसची आहे, हे जनावरांना सुद्धा माहीत आहे, असा टोलाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सांगली जिल्ह्यातील लोकांचे म्हणणं आहे की, सांगलीची जागा परंपरेनं काँग्रेसची आहे. आमचं मजबुत संघटन आहे. ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत. संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवशकता नाही. सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत आहे, तो कुठलाही व्यक्ती किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं ( संजय राऊत यांना टोला) तर तोही सांगेल की, सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे. कारण शेतकऱ्यांची जनावरं असतात. संजय राऊत कुठल्या अर्थाने बोलले मला माहित नाही, असा हल्ला विश्वजीत कदम यांनी चढवला.
सांगलीत दोनदा भाजपचा उमेदवार निवडून आलाय. त्यामुळेच बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपाने आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये ( उबाठा) काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा गेलीय. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य करू नये, असा इशाराच कदम यांनी दिला.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. भास्कर जाधव यांनी आम्हाला इशारा देऊ नये. इशारा देण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस पक्ष हा सव्वाशे वर्षाचा राष्ट्रीय पक्ष आहे. इतर कुणीही सांगली बाबतीत वक्तव्य करू नये अशी माझी विनंती आहे. आज बैठकीला विशाल पाटील माझ्या सोबत होते. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहोत. हीच भावना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितली आहे, असंही त्यांनी सांगितलं.