वर्धा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना शुक्रवारी गोंधळ झाला. विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळे आले. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला होता. आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात घेतली.
काय म्हणत होते आंदोलक
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आंदोलक स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत होते. यावेळी आंदोलकांनी काही कागदे फडली. पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना त्वरीत ताब्यात घेतले. त्यात महिला आंदोलकही होत्या. टीन्ही ९ शी बोलताना एक आंदोलक म्हणाली, आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे. विदर्भात बेरोजगारी वाढली आहे. यामुळे आमची मुले नैराश्यातून व्यसनाधीन झाली आहेत. ते दारु पितात, गांजा पितात. त्यांच्या भविष्यासाठी आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे.परंतु पोलिस आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा प्रश्न त्या आंदोलकाने उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. विदर्भात सुरु असलेले हे साहित्य संमेलन आहे. तुमचे विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. यासाठी सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. परंतु आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नका.
संमेलनाला कोण-कोण येणार
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. समारोप ते येणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
‘लाभले आम्हांस भाग्य…’गीत
उद्घाटन सत्रात ‘लाभले आम्हांस भाग्य…’ हे कविवर्य सुरेश भट यांचे गीत गाण्यात आले. संमेलन गीत तसेच दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाला आरंभ झाला. साहित्य संमेलनासाठी दोन कोटी निधी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे उषाताई तांबे यांनी आभार मानले.