वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना बुथवर मारहाण, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 20, 2024 | 5:09 PM

"त्याने मला मारहाण केली. त्यावेळी माझी पत्नी मला वाचवण्यासाठी आली तेव्हा त्याने तिलादेखील मारहाण केली. तसेच माझी दोन वर्षांची मुलगी खाली पडली असती. या मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे", अशी प्रतिक्रिया निलेश कराळे मास्तरांनी दिली.

वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना बुथवर मारहाण, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना बुथवर मारहाण
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर मतदान पार पडत आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. पण दिवसभरात आज काही ठिकाणी अनपेक्षित घटनाही समोर आल्या आहेत. कुठे दोन पक्षांचे उमेदवार समोरासमोर आले आहेत. तर कुठे लोकप्रतिनिधींची पोलिसांसमोर बाचाबाची झाली आहे. नाशिकमध्ये तर आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मर्डरची धमकी दिली. यावेळी मोठा राडा झालेला बघायला मिळाला. या सगळ्या गदारोळादरम्यान वर्ध्यातूनही मोठी बातमी समोर येत आहे. वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. निलेश कराळे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत निलेश कराळे यांना मारहाण केली जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

“निलेश कराळे यांनी या घटनेवर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या गावाहून मतदान करुन परत येत होतो. मी माझ्या वर्धा मतदारसंघात फिरण्यासाठी निघालो होतो. माझं संपूर्ण कुटुंबही माझ्यासोबत होतं. या दरम्यान मी उंबरी या गावी बुथवर थांबलो. उंबरी गावातून माझं रोजचं येणं-जाणं असतो. माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यात हे गाव येतं. त्यामुळे मी उंबरी या गावात बुथवर थांबलो. तिथल्या लोकांची विचारपूस केली. त्याआधी एक पोलीस गाडी त्या ठिकाणी येऊन गेली. तिथे आमदार पंकड भोयर यांचा बुथ होता. तिथे पंकज भोयर यांचे आठ लोकं बसून होते. तिथे बाकावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील लॅपटॉप घेऊन बसले होते”, असं निलेश कराळे यांनी सांगितलं.

‘त्याने मला मारहाण केली’

“मी पोलिसांना कॉल केला. पोलीस म्हणाले, येतो म्हणाले. त्यावेळी मी दोन पावलं थोडा पुढे आलो आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला विचारायला लागलो. तेव्हा तिथे भाजपच्या एका व्यक्तीने पुढे येत मला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीवर याआधीच अनेक केसेस आहेत. त्याने मला मारहाण केली. त्यावेळी माझी पत्नी मला वाचवण्यासाठी आली तेव्हा त्याने तिलादेखील मारहाण केली. तसेच माझी दोन वर्षांची मुलगी खाली पडली असती. या मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे”, अशी प्रतिक्रिया निलेश कराळे मास्तरांनी दिली.