वर्धा : शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आकाशातून सॅटेलाईट सदृश्य साहित्य जमिनीवर पडत असल्याचं नागरिकांना पहावयास मिळालं. या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. नागरिकांमध्ये घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळच्या सुमारास वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक (Wagheda Dhok in Samudrapur taluka) शिवारातील शेतात सॅटेलाईटचे अवशेष पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात हे साहित्य जप्त करीत तपासाला सुरुवात केली आहे. वाघेडा ढोक शिवारातील नितीन सोरटे (Nitin Sorte) यांच्या शेतात सकाळी त्यांना एक सिलिंडरच्या आकाराची वस्तू शेतकऱ्याच्या नजरेस पडली. शेतकऱ्याने तातडीने ही माहिती समुद्रपूर पोलिसांनी (Samudrapur Police) दिलीय. पोलिसांनी घटनास्थळी येत साहित्य जप्त केले आहे.
सिलिंडरच्या आकाराचे हे साहित्य असून, त्याच वजन जवळपास तीन ते चार किलो आहे. त्याची लांबी दोन ते अडीच फूट दरम्यान आहे. हा साहित्य आतून पोकळ असून प्लास्टिकसारख्या वस्तूचा असल्याचं निदर्शनास येत आहे. यावर काळ्या धाग्यासारख्या वास्तूचे आवरण असल्याची माहिती समुद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत यांनी दिली.
हे साहित्य समुद्रपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. महसूल विभागाला सुद्धा याची माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठच्या मार्गदर्शनात आणि सूचनेनुसार हे वस्तू काय आहे याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती राम खोत यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपारमध्ये अवकाशातून पडलेल्या वस्तूचा भाग सापडला. सुमारे साडेपाच किलो वजनाचा हा धातूचा गोळा आहे. पवनपारच्या जंगलात हा गोळा सापडला. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेतला. यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली. लाडबोरी येथे कोसळलेल्या वस्तूचा अभ्यासकांनी आढावा घेतला.