वर्धा : युवाच्या उलटा शब्द केला की, त्याचा अर्थ होतो वायू. युवा हा वायूच्या वेगानं काम करतो. म्हणून युवकांची मागणी कोणत्याही क्षेत्रात जास्त असते. पण, हा युवा कशात अग्रेसर आहे त्यावर देशाचं भवितव्य अवलंबून असते. आपल्या देशात युवक जास्त आहेत. त्यामुळं रोजगारासाठी (Employment) देशातील युवकांना मागणी जास्त आहे. पण, वर्धातील चित्र काहीस वेगळा आहे. युवक हे चांगल्या कामात नव्हे, तर गुन्हेगारी क्षेत्रात शिरल्याचं पाहायला मिळते. शिक्षणाचा गंध नाही. अजून मिसरूडही फुटलं नाही. तोवर पोलीस रेकॉर्डवर खून. खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गर्दी, मारामारींसह लूटमारीचे गुन्हे (Robbery). त्यात नामचीन टोळ्यांचा शिक्का. गांजा, अंमली पदार्थांच्या व्यसनांसह गुंडागर्दी आणि मिळकतीला तस्करीचा धंदा. 20 ते 35 वयोगटातील शेकडो पोरं आज गंभीर गुन्ह्यात कारागृहात जेरबंद झाली आहेत. काळजाचा ठोका चुकविणारे अन् मनाची घालमेल वाढविणारे वर्धा जिल्ह्यातील हे भीषण वास्तव. ऐन विशीत, गुन्हेगारीच्या कुशीत अशी काहीशी चिंताजनक स्थिती निर्माण होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
वर्ध्यातील गुन्हेगारी विश्वात धक्कादायक माहिती समोर आली. वर्धा कारागृहातील 25 टक्के बंदिवान 20 ते 35 वयोगटातील आहेत. यामुळं आजचा युवक कुठं चाललायं, हे पाहणं गरजेचं झालंय. वर्धा जिल्ह्याच्या कारागृहाची क्षमता 252 आहे. सध्या कारागृहात 460 बंदिवान असून 20 ते 35 वयोगटातील बंदिवान 145 आहे तर 36 ते 50 गटातील बंदिवान 225 आहे. 51 ते 70 वयोगटातील बंदिवान 92 आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात अगदी मिसरूडही न फुटलेल्यांकडून क्राईम वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं युवकांचं समुपदेशन करून त्यांना चांगल्या कामात कसं गुंतवता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भंडाऱ्यातही खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी तीन आरोपी हे विधीग्रस्त बालकं आहेत. हीच बालकं मोठी झाली की, गुन्हेगारी क्षेत्रात शिरतात. त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते ती, बऱ्यासाठी नव्हे. त्यामुळं बालकांच्या पालकांनी त्यांच्याकडं लक्ष ठेवणं गरजेच आहे. अन्यथा वायूच्या वेगानं हे युवक वाईट मार्गाकडं वळल्याशिवाय राहणार नाही.