वर्धा : वर्धेच्या जिल्हापरिषद सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आज जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबाराला (Janata Darbar) विविध विभागाच्या तक्रारी नागरिकांनी उपस्थित केल्या. यावर पालकमंत्री यांनी ऑन स्पॉट निकाल लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर अनेकांच्या तक्रारीवरून पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा फटकार लावलीय. महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधतं आज जनता दरबार आयोजित करण्यात आला. या दरबाराला 45 अंश तापमान असतानाही जनतेने आपले समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्याच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची येथे उपस्थिती होती.
प्रलंबित समस्यावरून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी झाडाझडती दरम्यान निरुत्तर झाले होते. पालकमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर अनेक प्रकरणे लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समितीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सदस्यांची उपस्थिती नव्हती तर काही माजी सदस्य उपस्थित होते.
जनता दरबारात अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. पालकमंत्र्यांकडून त्यांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. साहेब हे कर्मचारी खूप चकरा मारायला लावतात. वेळेवर हजर राहत नाहीत. काम करत नाहीत. नंतर या म्हणून सांगतात, किती खेपा मारायच्या असे अनेक प्रश्न विचारले. यावर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांच्या सुविधेसाठी तुम्हाला नेमण्यात आलंय. त्यामुळं त्यांची काम करा. अन्यथा तुम्हाला विचारतो कोण, अशाप्रकारे खडसावले. त्यामुळं बऱ्याच नागरिकांची कामे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.