विठ्ठल देशमुख, Tv9 मराठी, वाशिम | 4 ऑक्टोबर 2023 : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली. या मंत्रालयाचं प्रमुख पद प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना देण्यात आलं. दिव्यांग मंत्रालयाच्या प्रमुखाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय. पण त्यांना मंत्र्यांसारखा ताफा देण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावरुन आज बच्चू कडू यांनी भर कार्यक्रमात जाहीरपणे नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला. “शिंदे सरकारकडून मला फक्त मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. हे खाते केवळ नावापुरताच शिल्लक आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
दिव्यांग कल्याण विभागाचा ‘दिव्यांगाच्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत आज वाशिम येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांगांनी ठरवलं तर ते निवडणुकीत आमदाराचाही पत्ता कट करू शकतात, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
“शिंदे सरकारने मला फक्त मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. हे खाते केवळ नावापुरतेच शिल्लक आहे. ना कुठली गाडी, ना घोडे आहे, ना कुठले अधिकार. मात्र समाधान याचे आहे की, मी दिव्यांगांपर्यंत पोहोचू शकतो. अडचणी समजून घेऊन शकतो. येणाऱ्या काळात दिव्यांगाचे दुःख कमी करून तुमच्यासाठी लढत राहीन”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
“दिव्यांगासाठी 5 टक्के निधी खर्च होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक दिव्यांग घरकुल आणि विविध योजनेपासून वंचित राहतात. श्रीमंत लाभार्थी आहेत तर दिव्यांग माणूस योजनेपासून कोसो दूर आहे. हे सरकारचे अपयश आहे, असे बोलून बच्चू कडू यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.
या कार्यक्रमानंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना भाजपच्याच नेत्यांकडून आपल्याला त्रास दिला जातोय का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर खुलं आव्हान दिलं. “ही वस्तुस्थिती आहे. इकडे आम्हाला सत्तेत यायचं असं सांगायचं आणि दुसरीकडे ते मैत्री पाळत नाहीत. बच्चू कडू मतदारसंघात पडला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातोय. बावनकुळे यांनी एका भाजप खासदाराला सांगितलं, पण बच्चू कडूला पाडण्यासाठी असे 10 खासदार अजून पाठवा. बच्चू कडू पडणार नाही”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.