विठ्ठल देशमुख, Tv9 मराठी, वाशिम | 29 सप्टेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यक्रमात धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठी वक्तव्ये केली. नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची कान उघडणील केली. “मी प्रेशर आणून ठेकेदाराकडून काम करून घेतो. मात्र तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका. रस्त्याला तडा गेला, रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजर खाली टाकीन”, असं नितीन गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली.
“मी भxxगिरी केली नाही. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांपर्यंतची कामे दिली आहेत. पण एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे. रस्त्याला तडा गेला रस्ता खराब झाला तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
“राजकारणात खोटं बोलायच काम नाही. मी निवडणुकीत बॅनर लावणार नाही. कोणाला देशी-विदेशी दारू पाजणार नाही. मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. फक्त सेवा करायची”, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच “मी 45 वर्षांपासून मंत्री आहे. पण विमानतळावर मला घ्यायला कुत्रही येत नाही. मला सुरक्षा असल्यामुळे केवळ पोलीस असतात. कोणी हार घेऊन येत नाही, फुला हारात काही नाहीये, कामे झाली पाहिजेत”, असं नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. “तीन-चार वर्षांपूर्वी मी भूमिपूजन कामाकरिता आलो होतो. त्या कामचं लोकार्पण करण्यासाठी आलो आहे’, असं नितीन गडकरींनी सांगितलं. “वाशिममध्ये दहा हजार कोटींचे कामे पूर्ण होतील”, असंही गडकरी यांनी सांगितलं.
“कोरोना संकट काळात 100 कोटी रुपयांचं काम केलं. विदर्भात कठीण काळ होता. आक्सिजनची कमी होती. मी फोन करून ऑक्सिजनची व्यवस्था केली. 10 दिवसात 100 ट्रक आक्सिजन पोहोचवले. नांदेड, बुलढाणा ,अकोला, वाशिममध्ये ऑक्सिजन पुरवलं. विदर्भातील जेवढे जिल्हे मागणी होती त्याठिकाणी मी 500 व्हेंटिलेटर दिले”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.