अति घाई संकटात नेई, असं म्हणतात. कारण जास्त घाई केल्याने काही वेळेला गोष्टी बिघडतात आणि आपल्याला नको त्या संकटाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. वाशिममध्ये अशीच काहीशी एक घटना समोर येत आहे. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर एका भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की या धडकेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. तसेच या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना ही आज सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जण जखमी असल्याची देखील माहिती मिळत आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये बाप लेकाचा समावेश आहे. या घटनेत सात वर्षीय मुलासह 45 वर्षाच्या पित्याचा करून अंत झालाय. अपघातग्रस्त कार नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ते मालेगाव दरम्यान लोकेशन 218 जवळ ही अपघाताची घटना घडली. जखमींमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
अपघातग्रस्त कार ही नागपूरहून मुंबईच्या दिशेला जात होती. या दरम्यान वाशिम जिल्ह्यात उभ्या असलेल्या ट्रकला कार धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोन जण जागीच ठार झाले. तसेच गाडीचा चक्काचूर झाला. अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कारचा पुढचा भाग कापून दोन मृतदेह आणि इतर तीन जखमींना गाडीतून बाहेर काढण्यात आलं.
हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा अक्षरश: थरकाप उडालेला होता. कारण अपघातच इतका भीषण होता. त्यामुळे वाहन चालवताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून गाडी जितकी कंट्रोल होईल तितकीच गाडी चालवायला हवी. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडतात. गाडी चालवताना फोनवर बोलणं टाळलं पाहिजे. तसेच कारमध्ये असताना इतर गोष्टींमध्ये लक्ष विचलित न करता गाडी चालवण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. कारण आपल्यासह इतर प्रवाशांचादेखील जीव धोक्यात जावू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.