वाशिम : वाशिमच्या (Washim) मालेगाव (Malegaon) तालुक्यातील मोरणा नदीवरील (Morna River) पुलाचे दोन्ही बाजूचे सरंक्षक कठडे तुटल्याने वाहतूकीसाठी हा पुल धोकादायक ठरत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुलाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. अरुंद असलेल्या या पुलावर दोन्ही बाजूने सरंक्षक भीत नसल्याने रात्री बेरात्री पुलावरून वाहन जातांना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी गोकसावंगी येथील नागरीक करीत आहेत. महाराष्ट्रात सध्या सगळीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरणं भरली आहेत. त्याचबरोबर नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
वाशिम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तोंडगाव गावाला लागून असलेल्या चंद्रभागा नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाशिम -तोंडगाव,केकत उमरा,देवठाणा गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पावसाने उसंत घेतली नाही तर यापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुरामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून,खरिपाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वाशीम जिल्ह्यात 8 ऑगस्टच्या मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील भोपळपेंड नदीला पुर आला आहे. दरम्यान पुराच्या प्रवाहामुळे नदीच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहनधारक व प्रवासी अडकुन आहेत. तर काही जण नदीच्या प्रवाहातून जिव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.