मुंबई: अजित पवारांच्या (ajit pawar) घरावर धाड पडते. सुप्रिया सुळेंच्या घरावर धाड पडत नाही, हे काय गौडबंगाल आहे? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या प्रश्नाबाबत विचारलं असता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पत्रकारांवरच भडकले. हा या प्रश्न आहे का? हा पोरकट आरोप असून पोरकट प्रश्न आहे, असं सांगत शरद पवार (sharad pawar) यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार आणि मी काही वेगळं आहोत का? अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊ बहीण नाहीत का? एकाच्या घरात धाड पडली म्हणजे प्रत्येकाच्या घरात धाड पडावी या त्यांच्या भूमिकेचं तुम्ही समर्थन करता काय? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी केला. तसेच तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो प्रश्नच होऊ शकत नाही. हा काय प्रश्न आहे का? असा सवालही त्यांनी केला. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांचे सर्व आरोप खोडून काढले.
अजित पवार यांच्या घरावर धाड पडते, सुप्रिया सुळेंच्या घरावर धाड का पडत नाही? असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांनी विचारला. रेड पडते हे ते ठरवतात की मी ठरवतो? हा काय प्रश्न आहे? अजित पवार आणि मी काय वेगळा आहे? अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे काही बहीण भाऊ नाहीत. हा काय राजकीय प्रश्न आहे . हा पोरकट आरोप आहे आणि पोरकट प्रश्न आहे. अजित पवारांकडे काही झालं असेल किंवा माझ्याकडे काही झालं असेल तर अजित आणि मी काही वेगळे आहोत असं वाटतं तुम्हाला? प्रत्येकाच्या घराला ईडीने घेरावं अशी ही त्यांची भूमिका योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? काही तरी भाषण त्यांनी केलं त्याचा काय उल्लेख करायचं का?, असा सवालही शरद पवारांनी केला.
राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष आहे या राज यांच्या आरोपाचंही त्यांनी खंडन केलं. राष्ट्रवादीचं नेतृत्व सुरुवातीला छगन भुजबळांकडे होते. ते पहिले अध्यक्ष होते महाराष्ट्राचे. त्यानंतर मधुकर पिचड यांच्याकडे अध्यक्षपद होतं. ते आदिवासी होते. त्यानंतर धनंजय मुंडेंकडे होते. ते ओबीसी होते. भुजबळ ओबीसी. मधुकर पिचड पाहा. ज्या पक्षातील महत्त्वाच्या पदावर या पद्धतीने लोक येतात जबाबदारी घेतात. त्यावर उत्तर देण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एखादी व्यक्ती सहा महिन्यानंतर विधान करते. त्यांनी गांभीर्याने घ्यायचं नाही. परवाच मी अमरावतीत भाषण केलं. ते मागवून पाहा. या भाषणात मी शिवाजी महाराजांचं योगदान यावर 25 मिनिटे बोललो. अनेक गोष्टी मी सांगितल्या. सकाळी उठल्यावर न्यूज पेपर वाचण्याची मला सवय आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. त्यामुळे वृत्तपत्रात काय लिहिलं हे न वाचता कुणी काय बोलत असेल तर मी त्याला दोष देणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला
दुसरी गोष्ट म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो. त्याचा मला अभिमान आहे. या राज्यात शिवाजी महाराजांबाबत सविस्तर वृत्त काव्यात पहिल्यांदा कोणी लिहिलं असेल तर ते फुल्यांनी लिहिलं, आंबेडकर, शाहू आणि फुले हे शिवाजी महाराजांवर अस्था असणारे घटक आहेत. महाराजांचा आदेश लक्षात घेऊन आपल्या हातातील सत्तेचा वापर कसा करावा याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा विचारच मांडणंच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या: